येवल्यात आरोग्य यंत्रणेलाच झाली कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 09:33 PM2020-05-06T21:33:25+5:302020-05-06T23:57:30+5:30
येवला : कोरोना विषाणू संसर्गाने येथील आरोग्य यंत्रणाच बाधित झाल्याने प्रशासकीय यंत्रणेसह शहरात खळबळ उडाली आहे. कोरोनाने गवंडगाव, पाटोदा, अंगणगाव या ग्रामीण भागातील गावांमध्ये शिरकाव केला.
योगेंद्र वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : कोरोना विषाणू
संसर्गाने येथील आरोग्य यंत्रणाच बाधित झाल्याने प्रशासकीय यंत्रणेसह शहरात खळबळ उडाली आहे. कोरोनाने गवंडगाव, पाटोदा, अंगणगाव या ग्रामीण भागातील गावांमध्ये शिरकाव केला. या तीनही गावात प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे.
एकाच दिवसाच्या या
१६ बाधितांमुळे येवला तालुक्याचा कोरोनाबाधितांचा आकडा २५वर गेला आहे. विशेष म्हणजे या २५मध्ये १३ बाधित आरोग्य यंत्रणेशी संबंधित असून, एक पोलीस कर्मचारी असल्याचे सांगण्यात येते. येवल्यातील एकूण १०८ स्वॅब नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत ४८ अहवाल प्राप्त झाले असून ३१ अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
अद्याप ६० अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान, एकूण ७९ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून, १९१ व्यक्तींना होम कॉरण्टाइन राहण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, परिचारिका कोरोनाबाधित सिद्ध झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व संबंधित होम क्वॉरण्टाइन झाले होते, तर रुग्णालय कामकाज चालविण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली गेली होती.
-------------------
अंदरसूल : गावाजवळ गवंडगाव येथे कोरोनाबधित रुग्ण आढळून आल्याने अंदरसूलकरांमध्ये खळबळ उडाली आहे. येवला शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता अंदरसूल ग्रामस्थांनी आज सकाळपासून पूर्ण गाव कडकडीत बंद ठेवला आहे. गावातील व्यापारी पेठेतील सर्व किराणा दुकान बंद असून, भाजीपाला विक्र ीदेखील बंद होती. गावातील सुज्ञ नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
---------------------------
ग्रामीण भागही झाला सजग
येवला शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता ग्रामीण भागही सजग झाला आहे. लगतच्या गावांनी गावबंदी करत गाव प्रवेशाचे प्रमुख रस्ते बंद केले आहेत. याबरोबरच जनजागृतीवर भर दिला जात असून, सरपंच, पोलीसपाटील जातीने गावात लक्ष ठेवून आहेत. अनेक गावांनी सलग तीन दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, कठोर उपाययोजनांवर भर दिला जात आहे.
--------------------
पाटोद्यात कठोर उपाययोजना
पाटोदा : येथेही एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने गावात कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. गाव शंभर टक्के बंद असून, गावात प्रवेशाचे प्रमुख मार्गही बंद केल्या गेले आहेत. पाटोदा येथे रुग्ण आढळून आल्याने लगतच्या गावांमध्ये खळबळ उडाली आहे. लगतच्या गावांनीही आपल्या गावसीमा बंद केल्या आहेत. पिंपळगाव लेपचा पाटोदा गावांशी नजीकचा संपर्क असल्याने ग्रामपंचायतीने गाव बंद ठेवून प्रमुख रस्ते बंद केले आहेत. उद्यापासून सलग तीन दिवस गाव शंभर टक्के बंद ठेवले जाणार आहे.