कालिकेचे दर्शन घेण्यासाठी आता मेाजावे लागणार शंभर रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 01:22 AM2021-10-02T01:22:12+5:302021-10-02T01:22:43+5:30
कोरोनाचे सावट यावर्षीच्याही नवरात्रोत्सवावर कायम असले तरी शहरातील ग्रामदैवत कालिकेच्या भाविकांना या नवरात्रोत्सवात दर्शन घडणार आहे. मात्र, त्यासाठी भाविकांना प्रत्येकी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. वर्षभराच्या खंडानंतर मंदिर खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी टोकन, ऑनलाईन पास ठीक. मात्र, चक्क शंभर रुपये मोजावे लागणार असल्याने हा निर्णय वादग्रस्त ठरणार आहे.
नाशिक : कोरोनाचे सावट यावर्षीच्याही नवरात्रोत्सवावर कायम असले तरी शहरातील ग्रामदैवत कालिकेच्या भाविकांना या नवरात्रोत्सवात दर्शन घडणार आहे. मात्र, त्यासाठी भाविकांना प्रत्येकी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. वर्षभराच्या खंडानंतर मंदिर खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी टोकन, ऑनलाईन पास ठीक. मात्र, चक्क शंभर रुपये मोजावे लागणार असल्याने हा निर्णय वादग्रस्त ठरणार आहे.
नाशिक शहरात नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी कालिकादेवी मंदिर संस्थानतर्फे भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे गत दीड वर्षांपासून मंदिरे बंद असल्याने यात्रोत्सव होऊ शकलेला नाही, त्यामुळे संस्थाच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला असून ही उणीव भरून काढण्यासाठी, तसेच नवरात्रोत्सवात मंदिर व परिसरात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन टोकन अनिवार्य केले आहे. हे टोकन घेण्यासाठी भाविकांना शंभर रुपये मोजावे लागणार असल्याची माहिती संस्थानतर्फे पोलिसांसमवेत शुक्रवारी (दि.१) झालेल्या नियोजन बैठकीत देण्यात आली, तर पोलिसांनी या ऑनलाईन प्रणालीचे प्रात्यक्षिक ४ ऑक्टोबरपूर्वीच सादर करण्याच्या सूचना संस्थानला केल्या आहेत. या प्रात्यक्षिकात ऑनलाईन प्रणाली गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने सक्षम असल्यास पोलिसांकडून त्यासाठी परवानगी दिली आहे, बैठकीला कालिका देवी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष केशवराव पाटील, पोलीस उपआयुक्त अमोल तांबे, दीपाली खन्ना, महावितरणचे सहायक अभियंता राजेश श्रीनाथ, अग्निशमन दलाचे शाम राऊत, मनपा विभागीय कार्यालयाचे हरिश्चंद्र मदन, महापालिका आरोग्य विभागाचे राजू गायकवाड यांच्यासह संस्थान विशस्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
इन्फो..
अर्धा तासात ३० भाविकांना दर्शन
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कालिकादेवी मंदिर संस्थान व पोलीस प्रशासनाच्या नियोजन बैठकीत अर्धा तासात पाच पाचच्या टप्प्याने ३० भाविकांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे ऑनलाईन टोकन प्रणालीद्वारे एका कुटुंबातील सदस्यांना एकावेळी टोकन देण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या. त्यामुळे एका कुटुंबातील सदस्य एकाचवेळी येऊ-जाऊ शकणार असल्याने मंदिर परिसरातील गर्दी टाळण्यास मदत होणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून नमूद करण्यात आले. दरम्यान, भाविकांना त्यांच्यासोबत हळदी-कुंकू अथवा नारळ अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.
इन्फो
हार-फुले, खेळण्याच्या दुकानांवर बंदी
नवरात्रोत्सव काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना करून केवळ कालिकादेवीच्या दर्शनासाठी पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यात्रोत्सवाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे हार, फुलांच्या व खेळण्याच्या दुकानांवरही बंदी असणार असणार आहे. नवरात्रोत्सव काळात परिसरात
जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत. मात्र, नियमित पूजा विधी व आरती सुरू राहणार आहे.