नाशकात बसेसवर दगडफेक एक जखमी; महामार्ग जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 11:37 PM2018-01-03T23:37:38+5:302018-01-03T23:41:02+5:30
जिल्हाभर निदर्शने : लासलगावी बस पेटवण्याचा प्रयत्ननाशिक : भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला नाशिक शहरासह जिल्ह्यातून प्रतिसाद लाभला. विहितगाव येथे दगडफेकीत एकजण जखमी झाला. तर आंदोलकांनी मुंबई-आग्रा रोडवर चार तास चक्का जाम आंदोलन केले.
नाशिक : भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला नाशिक शहरासह जिल्ह्यातून प्रतिसाद लाभला. विहितगाव येथे दगडफेकीत एकजण जखमी झाला. तर आंदोलकांनी मुंबई-आग्रा रोडवर चार तास चक्का जाम आंदोलन केले. लासलगाव येथे बस पेटवण्याचा प्रयत्न तसेच निफाडसह शहरात एकूण तीन ठिकाणी बसगाड्यांचे नुकसान झाले. त्यामुळे तब्बल एक हजार बस गाड्या बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. जिल्ह्णात एकूण २१ ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी यांनी दिली.
पुण्याजवळील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (दि.१) झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी राज्यभर बंद पुकारला. या बंदला नाशिकमध्ये पाठिंबा मिळाला. शहरातील विविध उपनगरे व जिल्ह्णामधील काही गावांमध्ये घडलेल्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता दखलपात्र अनुचित घटना कुठेही घडल्याची नोंद प्रशासनाकडे नाही. आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. शहरात सकाळपासूनच बंदचा परिणाम दिसत होता. शाळा, महाविद्यालयांतील उपस्थिती जेमतेम होती. बाजारपेठाही बंद होत्या. विहितगाव येथे रिक्षावर भिरकावण्यात आलेल्या दगडामुळे एक युवक जखमी झाला. ही घटना वगळता शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सकाळी सीबीएस चौकाजवळ मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. तेथे तसेच नाशिकरोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बुद्धवंदना घेण्यात आली. मालेगावसह अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. बंद दरम्यान, कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. ठिकठिकाणी मोर्चे
महामार्गावर पोहोचलेल्या आंदोलकांनी चार तास चक्का जाम केला. अनेक ठिकाणी मोर्चा काढण्याचे प्रयत्न झाले. ग्रामीण भागात लासलगाव-मनमाड मार्गावर सकाळी बस पेटविण्याचा प्रयत्न झाला. निफाड येथेही बसचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. ठक्कर बाजार या बसस्थानकातही एक बस फोडण्यात आली.