शिरसगावजवळ अपघातात एक ठार
By admin | Published: February 20, 2016 09:25 PM2016-02-20T21:25:30+5:302016-02-20T21:26:02+5:30
शिरसगावजवळ अपघातात एक ठार
पाटोदा : येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील जागृत देवस्थान असणाऱ्या वजे्रश्वरी देवीच्या यात्रेसाठी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर येथून ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरीजवळ अपघात झाला. या अपघातात शिरसगाव येथील एक भाविक जागीच ठार झाला, तर पाचजण जखमी झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
शिरसगाव येथे श्री वज्रेश्वरी-मातेचा यात्रोत्सव सुरू असून, या यात्रेसाठी येथील आर्यपुत्र व्यायामशाळेचे सुमारे ५० ते ६० भाविक कोल्हापूर येथे ज्योत आणण्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना राहुरीजवळ पहाटे १ वाजेच्या सुमारास ट्रकने (क्र. एपी १२-५२८९) भाविकांच्या पिकअपला धडक दिल्याने पाठीमागे बसलेले भाविक खाली कोसळले. यात अमोल सोनूबापू आजगे (२१, रा, वळदगाव) याचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील महिपत आजगे (२३), उमेशकुमार शिवाजी वादगे (३०), संतोष शिवराम आजगे (३३), धनंजय प्रभाकर वादगे (३२), विश्वास भास्कर आजगे (२६) सर्व वळदगाव हे जखमी झाले. अपघाताचे वृत्त शिरसगाव येथे कळताच गावावर शोककळा पसरली. अमोल आजगे याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)