देवळा येथे तिहेरी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 12:32 AM2022-02-22T00:32:49+5:302022-02-22T00:33:58+5:30
देवळा : येथील देवळा - नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोर सोमवारी दुपारी ट्रॅक्टर, आयशर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार, तर दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
देवळा : येथील देवळा - नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोर सोमवारी दुपारी ट्रॅक्टर, आयशर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार, तर दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी (दि. २१) दुपारी २ वाजेच्या सुमारास देवळा - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोरून भावडबारी घाटाच्या दिशेने जाणारी दुचाकी (एमएच ४१ एएफ ५९५७) ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने जोरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील राजेश भारत खैरनार (३०, रा. भाक्षी) हे जागीच ठार झाले, तर गणेश विजय पगारे (३०), सोमनाथ विजय पगारे (२५) दोघे रा. मुळाणे, ता. सटाणा हे गंभीर जखमी झाले.
अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील शेतकरी व युवक घटनास्थळी धावून आले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही जखमींना तातडीने देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्यांची गंभीर परिस्थिती पाहून गणेश पगारे याला नाशिक येथे, तर सोमनाथ पगारे याला मालेगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेनंतर देवळा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात याच ठिकाणी दुचाकी व इर्टिगा कार यांचा भीषण अपघात झाला होता. अपघातात दुचाकीस्वार रामेश्वर येथील एकाच कुटुंबातील पती-पत्नी व दोन मुले असा एकूण चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दुर्गा हॉटेलसमोर असलेल्या रस्त्यावर असलेले खड्डे यापूर्वी येथे झालेल्या अपघातांना कारणीभूत ठरले असून, अनेकांचा त्यात बळी गेला आहे.