रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 14:18 IST2019-04-25T14:18:04+5:302019-04-25T14:18:15+5:30
नांदूरशिंगोटे: नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर नांदूरशिंगोटे शिवारात मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण ठार झाल्याची घटना घडली.

रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
नांदूरशिंगोटे: नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर नांदूरशिंगोटे शिवारात मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण ठार झाल्याची घटना घडली. हरी कारभारी शेळके (४२) रा. नांदूरशिंगोटे ता. सिन्नर असे मृताचे नाव आहे. नांदूरशिंगोटे- दोडी दरम्यान असणाऱ्या गोपालकृष्ण लॉन्स येथे शेळके हळदीच्या कार्यक्रमासाठी सहकुटुंब आले होते. जवळच्या नातेवाईकांचा असणारा हळदीचा कार्यक्रम आटोपून ते पत्नीसोबत महामार्गाच्या पलीकडे रस्त्यालगत उभ्या केलेल्या दुचाकीकडे जात होते. महामार्ग ओलांडत असताना त्यांना एका अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने शेळके यांच्या अपघातस्थळीच मृत्यू झाला. अपघात झाल्यावर सदर अज्ञात वाहन वेगात पसार झाले. नातेवाईकांनी शेळके यांना तातडीने दोडी येथील ग्रामीण रूग्णालयात हलवले. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वी ते मृत पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री ११ वाजता दिपक बर्के यांनी वावी पोलिस ठाण्यात माहिती दिल्यावर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली. मयत शेळके यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, आईवडील असा परिवार आहे. नांदूरशिंगोटे येथे शेळके यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अपघात झाल्यावर अनेकांनी नांदूरशिंगोटे येथील पोलीस दूरक्षेत्रात संपर्क साधला असता तेथील दूरध्वनी उचलला गेला नाही. काहींनी पोलीस चौकीत समक्ष धाव घेतली असता तेथे एकही पोलीस कर्मचारी उपलब्ध नव्हता. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे यांना माहिती दिल्यानंतर वावी येथून पोलिस पथक अपघातस्थळी पोहोचले. सध्या निवडणुकीची धामधूम असल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ सुरु आहे.