पत्नीने दिली पतीच्या खुनाची एक लाखात सुपारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 01:17 AM2022-02-02T01:17:41+5:302022-02-02T01:18:18+5:30
प्रियकराच्या मदतीने एक लाख रुपयांत पतीचा काटा काढण्याची सुपारी देणाऱ्या पत्नीसह सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत. निफाड येथील सचिन दुसाने यांच्या खुनाचा पाच दिवसांत पोलिसांनी उलगडा केला
नाशिक : प्रियकराच्या मदतीने एक लाख रुपयांत पतीचा काटा काढण्याची सुपारी देणाऱ्या पत्नीसह सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत. निफाड येथील सचिन दुसाने यांच्या खुनाचा पाच दिवसांत पोलिसांनी उलगडा केला. न्यायालयाने या संशयितांना शुक्रवारपर्यंत (दि. ४) पोलीस कोठडी सुनावली आहे. दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे संशयित आरोपी शोभा सचिन दुसाने हिने कट रचून सचिन यांचा काटा काढण्याचे ठरविले. यासाठी तिने तिचा प्रियकर संशयित आरोपी दत्तात्रय शंकर महाजनची मदत घेतली. नाशिकरोड येथील सराईत गुन्हेगार संशयित संदील किट्टू स्वामी व अशोक मोहन काळे यांना एक लाख रुपयांत त्यांनी सुपारी दिली. साथीदारांच्या मदतीने सचिनचा निफाडच्या राहत्या घरात २३ जानेवारी २०२२ रोजी रात्री गळा आवळला व लोखंडी सळईने ठार मारले. चेहरा विद्रूप केल्याने मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते. अधीक्षक सचिन पाटील यांनी या खुनाचा उलगडा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाला आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. पाच दिवसांत कोणतेही ठोस पुरावे नसतानाही खुनाचा छडा लावला, अशी माहिती सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
--इन्फो--
कोटंबी घाटातील दरीत फेकला मृतदेह
सचिनच्या जुन्या डस्टर कारच्या (एमएच ४३ - एडब्ल्यू १३०८) डिक्कीत त्याचा मृतदेह टाकला. या कारच्या पुढे-मागे गुन्हेगारांनी त्यांची इंडिव्हिर कार (एमएच ०४ - डीएन ३५९३) व स्विफ्ट डिझायर कार (एमएच १५ - डीएम८६४३) चालवत थेट पेठजवळील कोटंबी घाट गाठत, दरीत मृतदेह फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह एका झाडाला अडकल्याने सकाळी पोलिसांना आढळून आला.
--इन्फो--
...या संशयितांना ठोकल्या बेड्या
दत्तात्रय महाजन, शोभा दुसाने, संदील स्वामी, अशोक काळे, गाेरख नामदेव जगताप, पिंटू उर्फ बाळासाहेब मारुती मोगरे (रा. निफाड), भंगार व्यावसायिक मुकरम जहीर अहेमद यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एक लाखाची रोकडसह मोटारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
--इन्फो--
डस्टर कारचेही केले तुकडे
सचिनचा मृतदेह कोटंबी घाटात फेकल्यानंतर त्याची डस्टर कार नाशिकमध्ये आणून मुकरमच्या भंगाराच्या गोदामात नेऊन कटरद्वारे तुकडे केले. यामुळे पोलिसांना सचिनच्या गाडीचाही शोध लागत नव्हता. पुतण्याने त्याचे काका सचिन बेपत्ता झाल्याची तक्रार निफाडमध्ये रविवारी (दि. २७) दिली होती.