फ्लॅट भाड्याने घेण्याच्या नावाखाली महिलेला एक लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:18 AM2021-08-21T04:18:43+5:302021-08-21T04:18:43+5:30
पंचवटी : फ्लॅट भाड्याने घ्यायचा असल्याचा सांगत त्यासाठी अनामत रक्कम पाठवितो असे सांगून म्हसरूळ शिवारातील एका महिलेला वेगवेगळ्या फोनवरून ...
पंचवटी : फ्लॅट भाड्याने घ्यायचा असल्याचा सांगत त्यासाठी अनामत रक्कम पाठवितो असे सांगून म्हसरूळ शिवारातील एका महिलेला वेगवेगळ्या फोनवरून संपर्क साधून ऑनलाइन गुगल पे, पेटीएम क्यू आर कोड पाठवून १ लाख १० हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, फसवणूक झालेल्या महिलेने म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल कुमार असे फसवणूक करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. त्याने पीडित महिलेला तिचे नातेवाईक असलेल्या संजीव पाटील यांचा फ्लॅट भाड्याने घ्यायचा असल्याचे सांगत त्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अनामत रक्कम पाठवितो, अशी बतावणी केली. अनामत रक्कम पाठविण्यासाठी फोन पे, गुगल पे, पेटीएमद्वारे संशयिताने सुरुवातीला काही रक्कम त्या महिलेच्या खात्यावर पाठविली. त्यानंतर पुन्हा रक्कम पाठवून क्यूआर कोड पाठविला. त्यानंतर पीडित महिला व तिची मैत्रीण व त्यांच्या अन्य दोघा मैत्रिणींनी संशयित अनिल कुमार याच्या खात्यावर ऑनलाइन पैसे पाठविले. त्यानंतर मात्र संशयिताने ही रक्कम परत न पाठविता फसवणूक केली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी तपास करीत आहेत.