आर्टीलरीच्या जवानाला एक लाखाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:12 AM2021-07-15T04:12:29+5:302021-07-15T04:12:29+5:30
खरात यांना ९ जून रोजी संशयित विकास जैन व अंशुमन साहू या नावाच्या दोघा व्यक्तींनी फोन करून एका कर्ज ...
खरात यांना ९ जून रोजी संशयित विकास जैन व अंशुमन साहू या नावाच्या दोघा व्यक्तींनी फोन करून एका कर्ज देणाऱ्या प्रसिद्ध कंपनीचे नाव घेत तेथून बोलत असल्याचे सांगितले. कंपनीकडून तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज मंजूर करण्यात येत असल्याचे सांगितले, तसेच खरात यांना कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहित केले, तसेच विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यास भाग पाडले. सुरुवातीच्या टप्प्यातील प्रक्रिया शुल्क म्हणून अडीच हजार रुपये खरात यांच्याकडून या दोघांनी उकळल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर संशयित पंकज सिंग भदोरिया व राजेश यादव नावाच्या अन्य दोघा व्यक्तींनी खरात यांच्याशी संपर्क साधला. ‘तुम्हाला फसवले जात असून, आम्ही तुम्हाला तुमचे पैसे पुन्हा देतो’ असे आमिष दाखवून २ हजार १५० रुपये घेतले. त्यानंतर कर्ज मंजूर झाल्याचा बनावट ई-मेल खरात यांना मिळाला. यानंतर पुन्हा संशयितांनी संगनमताने प्रोसेसिंग शु्ल्क म्हणून २ हजार १५० रुपयांची मागणी केली. विविध कारणे देत खरात यांच्याकडून हजारो रुपये घेतले; मात्र पुन्हा पैशांची मागणी होत असल्याने खरात यांनी पैसे देण्यास नकार दिला. संशयितांनी खरात यांच्याकडून वेगवेगळी कारणे सांगून १ लाख ९ हजार ९०५ रुपये घेतले आहेत. याबाबत खरात यांनी संशयितांनी फसवणूक केल्याचा आरोप करत उपनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
---इन्फो---
कस्टमर केअरही निघाला बनावट
खरात यांना फसवणूक होत असल्याचा संशय आल्याने त्यांनी इंटरनेटवरून संबंधित कंपनीच्या नावाने कस्टमर केअर क्रमांक शोधला. या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यावेळी समोरील व्यक्तीने त्याचे नाव संजीव कुमार असल्याचे सांगत मधुर आवाजात त्यांना तक्रारीचे निराकरण करण्याची पूर्ण हमी देत विश्वासात घेतले आणि २० हजार रुपये मागितले. खरात यांनी विश्वासापोटी त्यास ऑनलाइन रक्कम पाठविली; मात्र येथेही त्यांची फसवणूकच झाली.