रेल्वेच्या बनावट नियुक्ती पत्राद्वारे एकाला नऊ लाखाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 01:03 AM2021-11-18T01:03:42+5:302021-11-18T01:03:59+5:30
सटाणा शहरातील एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाला रेल्वेतील क्लर्कचे बनावट नियुक्तीपत्र दाखवून सातारा जिल्ह्यातील पिता-पुत्रासह तिघांनी नऊ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सटाणा : शहरातील एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाला रेल्वेतील क्लर्कचे बनावट नियुक्तीपत्र दाखवून सातारा जिल्ह्यातील पिता-पुत्रासह तिघांनी नऊ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील सुभाष रोड क्रमांक चारमधील रहिवासी अनिल पोपट सोनवणे यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. नोकरी मिळवण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले. मात्र, त्यांना नोकरी मिळत नसल्याने विवंचनेत होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विकास जाधव यांनी अनिल यांच्याशी चर्चा करीत असताना माझ्या ओळखीतली व्यक्ती तुझ्या नोकरीचे काम करून देऊ शकते. त्यानुसार दोघांनी संदीप शुक्राचार्य साळुंखे, प्रियंका साळुंखे, शुक्राचार्य आबाजी साळुंखे (दोघे राहणार वराडे, ता. कराड, जिल्हा सातारा) व नितीन आकाराम बारापते (राहणार शिव गणेश मंदिरजवळ कामेरी, ता. वडाळा, जिल्हा सांगली) यांच्याशी संपर्क करून दिला. त्यानंतर रेल्वे खात्यात जागा असल्याचे सांगून नोकरीला लावून देण्यासाठी ९ लाख रुपये देण्याचे निश्चित झाले. टप्प्याटप्प्याने अनिल याने आपल्या बँक खात्यातून साळुंखे यांना ऑनलाईन पैसे पाठवले. साळुंखे यांनी रेल्वेचे बनावट सही, शिक्के असलेले क्लर्कचे बनावट नियुक्ती पत्र दाखवले. त्यानंतर अर्ज भरून वैद्यकीय दाखला मिळविला. मात्र, तीन वर्षे उलटूनही नोकरीची ऑर्डर येत नाही, हे लक्षात आल्यावर अनिल यांनी साळुंखे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी संपर्क करणे टाळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनिल सोनवणे यांनी नोकरीसाठी पैसे दिल्याचे पुरावे दाखवून तक्रार दाखल केली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील शुक्राचार्य साळुंखे, संदीप साळुंखे, नितीन बारापते यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.