घरफोडीतील दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:03 AM2018-03-17T01:03:18+5:302018-03-17T01:03:18+5:30
घरफोडी व दुचाकी करणाऱ्या दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली असून, त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे़ सचिन मच्छिंद्र उकिरडे (२५, शिवाजीनगर सातपूर) व अमोल बाळासाहेब नवले (२४, शिवाजीनगर, सातपूर, मूळ राहणार धामोरी, ताक़ोपरगाव, जि़अहमदनगर) अशी या दोघा संशयितांची नावे आहेत़
नाशिक : घरफोडी व दुचाकी करणाऱ्या दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली असून, त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे़ सचिन मच्छिंद्र उकिरडे (२५, शिवाजीनगर सातपूर) व अमोल बाळासाहेब नवले (२४, शिवाजीनगर, सातपूर, मूळ राहणार धामोरी, ताक़ोपरगाव, जि़अहमदनगर) अशी या दोघा संशयितांची नावे आहेत़ श्रमिकनगरमधील इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळील रहिवासी विकास सोनवणे यांची उघड्या घराच्या खिडकीतून मोबाइल व घराबाहेरील अॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, एफव्ही ६४९६) चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती़ या गुन्ह्याचा तपास युनिट दोन अधिकारी व कर्मचारी करीत होते़ पोलीस नाईक मोतीलाल महाजन यांना मिळालेल्या माहितीवरून सातपूर कॉलनीतून संशयित उकिरडे व नवले या दोघांना अटक केली़ त्यांच्याकडून अॅक्टिवा दुचाकी, मोबाइल व दोन तोळे सोने, असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ शहर गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक नीलेश माइनकर, उपनिरीक्षक रवींद्र सहारे, राजाराम वाघ आदिंनी ही कामगिरी केली़