बुडालेले एक लाख रुपये वृद्धाच्या पुन्हा आले पदरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:14 AM2020-12-22T04:14:58+5:302020-12-22T04:14:58+5:30
बॅँकेतून बोलत असल्याचे भासवून सायबर गुन्हेगाराने क्रेडिट व डेबिट कार्डांची माहिती व ओटीपी क्रमांक मिळवून वृद्धाला एक लाख ...
बॅँकेतून बोलत असल्याचे भासवून सायबर गुन्हेगाराने क्रेडिट व डेबिट कार्डांची माहिती व ओटीपी क्रमांक मिळवून वृद्धाला एक लाख रुपयांस ऑनलाइन गंडा घालण्यात आला. बोलण्याच्या ओघात फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने एंडाईत यांच्याकडून त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती व ओटीपी मिळवून ऑनलाइन एक लाखाची रक्कम परस्पर लांबविली. याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर सायबर पोलिसांनी माहिती घेत वेगवान तपास सुरु केला. त्यांच्या खात्यावरील ७० हजार रुपये कॅश फ्री रिटेल या व्हॉलेटवर तर ३० हजार रुपये ‘एमपीएल’ नावाच्या गेमींग अॅपवर गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. ही रक्कम परत मिळण्याची शक्यता वाटत असल्याने पोलिसांनी कॅश फ्री व एमपीएल यांना तत्काळ सायबर पोलिसांकडून मेल धाडण्यात आला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या नोडल अधिकाऱ्यांसोबत मोबाईलवरुन संपर्क केला. त्यामुळे फिर्यादीचे एंडाईत यांना त्यांचे एक लाख रुपये पुन्हा परत मिळाले. त्यांनी पोलिसांविषयीची कृतज्ञता सायबर पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.२१) सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पेढे वाटून व्यक्त केली.
तसेच फसवणूक करणाऱ्यांच्या एमपीएल खात्यातून इतर तक्रारदारांचे ८० हजार रुपये परत मागवण्यात आले असून फिर्यादीनी संपर्क साधल्यानंतर ते त्यांना परत करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी सांगितले.