एकाच दिवशी १३ जणांना श्वानदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:31 PM2020-02-07T23:31:12+5:302020-02-08T00:00:48+5:30
मोकाट श्वानांनी अक्षरश: हैदोस घातला असून, शुक्रवारी शहरात १३ जणांना श्वानाने चावा घेतल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, मनपाने मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
मालेगाव मध्य : शहरात मोकाट श्वानांनी अक्षरश: हैदोस घातला असून, शुक्रवारी शहरात १३ जणांना श्वानाने चावा घेतल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, मनपाने मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
शहरातील कल्लुकुट्टी दरगाह मैदान, कुसुंबारोड, आंबेडकरनगर, पंचशीलनगर, गुलशेरनगर, पवारवाडी, मैला डेपो अशा विविध भागांमध्ये श्वानांच्या झुंडी दिसून येत आहेत. त्यामुळे या भागातून दिवसाही नागरिकांना सावध भूमिका घेत रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. प्रामुख्याने मालधे येथील कचरा डेपो व पवारवाडी परिसरात श्वानांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे म्हाळदे घरकुल योजनेत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना जीव मुठीत घेऊन कचरा डेपोजवळून प्रवास करावा लागत आहे. रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणावर श्वान रस्त्यांमध्येच बसलेले असतात. श्वान वाहनांचा पाठलागही करतात. त्यामुळे दुचाकीधारकांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा किरकोळ स्वरूपाचे अपघातही होतात. मनपाकडून श्वान निर्बीजीकरण करण्यात येत होते; मात्र दोन वर्षांपासून ही मोहीम बंद करण्यात आल्याने शहरात श्वानांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मनपा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
शोएब अंजूम उस्मान गनी, रा. म्हाळधे घरकुल योजना या अडीच वर्षीय बालकास श्वानाने चावा घेतला, तर शुक्रवारी शहरातील हुमैराबानो, गोकुळ बोराडे, गौतम वाघ, गौरव खैरनार, मंगल जाधव, सुवर्णा राऊत, गिरीश निकम, वैभव देवरे, निंबा कांबळे, रमेश बोराळे, कुणाल पवार, विनय सोनवणे व अर्जुन चित्ते यांना श्वानाने चावा घेतला. जखमींवर सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात येऊन घरी सोडण्यात आले. ३, ७, १४ व २१ दिवसांपूर्वी चावा घेतलेल्या अनुक्रमे ६, १३, ६ व ७ अशा एकूण ४५ जणांवरही उपचार करण्यात आले.
मनपाकडून शहरातील श्वानांचे निर्र्बीजीकरण करण्यासाठी उस्मानाबाद येथील कृष्णा सोसायटी फॉर अॅनिमल या संस्थेस ९४ लाख ६० हजार रुपयांचा ठेका देण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात संस्थेस कार्यारंभ आदेश देण्यात येणार असून, सदर ठेका हा तीन वर्षांचा आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील श्वानांवर निर्बीजीकरणाची मोहीम राबविण्यात येईल.
- अनिल पारखे
स्वच्छता प्रमुख, मनपा