मांजा अडकून गाल चिरल्याने एकजण गंभीर जखमी, सुदैवाने गळा वाचला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 08:28 PM2023-01-15T20:28:38+5:302023-01-15T20:28:44+5:30
खोलवर जखम; उपचारासाठी सिन्नरला हलवले
शैलेश कर्पे
सिन्नर (जि नाशिक) : तालुक्याच्या पूर्व वावी येथे पतंगाचा मांजा अडकून दुचाकीस्वाराचा गाल चिरल्याची घटना घडली. सुदैवाने मांजा गळ्यात न अडकल्याने मोठी आपत्ती टळली असली तरी त्याला गंभीर जखम झाली असून दहा टाके पडले आहेत. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. पूर्व भागातील कहांडळवाडी येथून दगु नाना वाघ(५०) हे शेतकरी धान्य दळण दळण्यासाठी दुचाकीहून वावीकडे येत होते.
वावी गावात प्रवेश करताच नूतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जवळ पतंगाचा मांजा त्यांच्या चेहऱ्यावर अडकला. वाघ हे दुचाकीवर असल्याने मांजा ओढला गेला. या या घटनेत त्यांच्या गालाच्या वर आणि कानाजवळ गंभीर दुखापत झाली. डाव्या बाजूला मोठी गंभीर जखम झाल्याने रक्तबंबाळ झालेल्या वाघ यांना वावीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तथापि जखम गंभीर आणि खोल असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी सिन्नरला नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असलेल्या १०८ रुग्णवाहिकेला तातडीने बोलावून वाघ यांची रवानगी सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. वाघ यांच्यावर सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले एक सेंटीमीटर खोल व पाच सेंटीमीटर लांबीची वाघ यांच्या गालावर मोठी जखम झाली. त्यांच्यावर सुमारे दहा टक्के घालण्यात आले वाघ यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
वाघ यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, सिन्नर शहर व तालुक्यात मकरसंक्रांतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा करण्यात आला. पतंगाच्या मागे बेफान होऊन धावणारी मुले आणि पतंग कापाकापी ची रस्सीखेच आणि ओरडण्याचा आवाज सर्वत्र ऐकू येत होता.