एकलहऱ्यातील एक संच बंद
By admin | Published: May 7, 2017 01:31 AM2017-05-07T01:31:48+5:302017-05-07T01:32:39+5:30
एकलहरे औष्णिक केंद्रामधील वीजनिर्मिती करणाऱ्या पाचपैकी तीन संचावर आलेल्या या प्रकल्पामध्ये सध्या दोनच संच कार्यान्वित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यभरातून वाढलेल्या विजेच्या मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याने भारनियमन सुरू करण्यात आले आहे. यास एकलहरे औष्णिक केंद्रामधील नादुरुस्त व तोकडे संचदेखील कारणीभूत ठरले आहे. वीजनिर्मिती करणाऱ्या पाचपैकी तीन संचावर आलेल्या या प्रकल्पामध्ये सध्या दोनच संच कार्यान्वित असून, दिवसाला ४२० मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे.
नाशिकमधील एकलहरे येथे असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रावर सुमारे चार वर्षांपूर्वी पाच संचाद्वारे वीजनिर्मितीचे कार्य केले जात होते. यापैकी दोन संच सुमारे तीस वर्षांपेक्षा अधिक जुने झाल्यामुळे ते कालबाह्य ठरविले गेले. त्यानंतर प्रकल्पाची भिस्त तीन संचावर येऊन ठेपली. एकूण ६३० मेगावॉट वीजनिर्मिती या प्रकल्पामधून होत असे; मात्र सातत्याने होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे एक संच या उन्हाळ्यात दोनदा बंद राहिला तर दुरुस्तीसाठी पुन्हा आठवडाभरापासून संच बंद पडलेला आहे. यामुळे सध्या आठवडाभरापासून प्रतिदिनी ४२० मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. कोळशाच्या वाहतुकीचा खर्च परवडत नसल्यामुळे हा प्रकल्प स्थलांतरित करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू होत्या. त्यामुळे दोन संच चार वर्षांपूर्वीच बंद पडूनदेखील नवीन संच मिळू शकलेले नाहीत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी नागपूर येथे या प्रकल्पाला नवीन संच उपलब्ध करून देत पूर्ण क्षमतेने वीजनिर्मितीला चालना दिली जाईल, अशी घोषणा केली होती. यामुळे कर्मचाऱ्यांना-देखील दिलासा मिळाला होता; मात्र अद्याप नवीन संच देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने कोणतीही पावले उचललेली नाही. त्यामुळे
तीन संचांवर वीजनिर्मितीचे कार्य सुरू आहे.