श्रमिक रेल्वेतून उत्तर प्रदेशला एक हजार ३२ मजूर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 12:43 AM2020-05-29T00:43:49+5:302020-05-29T00:44:08+5:30
नाशिकरोड रेल्वेस्थानकातून गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास उत्तर प्रदेशातील गोरखपूरला शहरासह जिल्हाभरातील १ हजार ३२ मजूर कामगारांना घेऊन श्रमिक रेल्वे रवाना झाली.
नाशिकरोड : नाशिकरोडरेल्वेस्थानकातून गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास उत्तर प्रदेशातील गोरखपूरला शहरासह जिल्हाभरातील १ हजार ३२ मजूर कामगारांना घेऊन श्रमिक रेल्वे रवाना झाली.
जिल्हा प्रशासनाकडे नोंद केलेल्या लहान मुलांसह एक हजार ३२ मजूर कामगार नाशिकरोड रेल्वेस्थानकातून उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे श्रमिक रेल्वेने रवाना झाले. या गाडीत भुसावळहून ३६५ प्रवासी बसले. त्यात जळगाव जिल्ह्यातील १५५, तर नंदुरबार जिल्ह्यातील २१० प्रवासी होते. या गाडीसाठी एकूण १३६५ तिकिटांची विक्री झाली असून, तिकिटाचा दर प्रत्येकी ६७० रुपये होता. नाशिक, सिन्नर, कळवण, सटाणा, त्र्यंबके श्वर आदी तालुक्यातून परप्रांतीयांना नाशिकरोड स्थानकात आणण्यात आले. गाडीत बसण्यापूर्वी त्यांना पुरी, भाजी, पुलाव व पाण्याच्या दोन बाटल्या सोबत देण्यात आल्या. यासाठी स्वयंसेवी संस्थांनीही मदत केली. नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रबंधक आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत, रेल्वे पोलीस निरीक्षक अशोक जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली श्रमिक रेल्वे रवाना झाली. जिल्हा व महापालिका प्रशासनाचेही प्रतिनिधी उपस्थित होते.
एक तासात होते जेवण तयार
मुंबईहून एकूण १४० रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. काही गाड्या नाशिकरोड रेल्वेस्थानकात थांबत असून, या प्रवाशांना रेल्वेतर्फे मोफत नाश्ता तसेच अन्नाची पाकिटे दिली जात आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल्वे थांबणार असल्याचा मेसेज येताच एक तासात जेवण तयार करण्यात येत आहे. स्थानकातील खाद्यपदार्थाचे कॅन्टिंग उघडण्यात आले आहेत.