जिल्ह्यात अवघ्या २४ दिवसांत कोरोनाचे एक हजार बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 01:13 AM2021-05-15T01:13:46+5:302021-05-15T01:14:11+5:30
जिल्ह्यात कोरोनाचे थैमान गत दोन महिन्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. कोरोनाने गत १३ महिन्यात गेलेल्या चार हजार बळींपैकी मागील एक हजार बळी हे अवघ्या २४ दिवसांत गेले आहेत. बळींची ही आकडेवारी भयप्रद असून, जिल्ह्याचे वास्तव अधोरेखित करणारी आहे.
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान गत दोन महिन्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. कोरोनाने गत १३ महिन्यात गेलेल्या चार हजार बळींपैकी मागील एक हजार बळी हे अवघ्या २४ दिवसांत गेले आहेत. बळींची ही आकडेवारी भयप्रद असून, जिल्ह्याचे वास्तव अधोरेखित करणारी आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गतवर्षी २९ मार्चला, तर पहिला बळी गतवर्षी ८ एप्रिलला आढळला होता. मात्र, त्यानंतरच्या प्रारंभीच्या टप्प्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीसह बळींचा वेग तुलनेने खूपच कमी होता. त्यामुळेच प्रारंभीच्या एक हजार बळींचा टप्पा गाठण्यासाठी तब्बल पाच महिन्यांहून अधिक कालावधी लागला होता. गतवर्षी १० सप्टेंबरला कोरोना बळींनी एक हजारांचा टप्पा ओलांडला. त्यावेळीदेखील कोराेना गतवर्षातील सर्वोच्च पातळीवर होता. त्यानंतरचा पुढील सहा महिन्यांच्या काळातही कोरोना बळींमध्ये खूप वेगाने वाढ झाली नव्हती. मात्र, मार्चपासून बळींच्या संख्येत झालेली वाढ चिंतेत भर घालणारी ठरली आहे.
मागील हजार बळी सर्वाधिक वेगाने
जानेवारीपासून फेब्रुवारीपर्यंत कोरोनाच्या बळींचा वेग फारसा वाढला नव्हता. मात्र, मार्चपासून पुन्हा वेग वाढल्याने तिसऱ्या हजार बळींचा टप्पा गाठण्यासाठी २० एप्रिलपर्यंतचा काळ जावा लागला. म्हणजे दोन हजारपुढील हजार बळींसाठी सुमारे साडेतीन महिन्यांचा १०० दिवसांहून अधिक काळ लागला होता, तर तीन हजारनंतरच्या चार हजार बळींपर्यंतचा हजार बळींचा टप्पा गुरुवारी (दि.१३ मे) अवघ्या २४ दिवसात गाठला गेल्याने बळींचा वेग चौपटीहून अधिक झाल्याचे दिसून येत आहे.
चार महिन्यांनी पुढचे हजार बळी
गतवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाने सर्वाधिक बळी घेतले होते. सप्टेंबरमध्ये एक हजार बळींचा टप्पा ओलांडल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात तर मृत्युदर खूपच कमी झाला होता. त्यामुळेच कोरोनाच्या दोन हजार बळींसाठी त्यानंतर तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागला होता. ७ जानेवारीला कोरोनाचे दोन हजार बळी पूर्ण झाले होते.