गंगापूर धरणातून एक हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:16 AM2018-03-26T00:16:49+5:302018-03-26T00:16:49+5:30
जीवनदायिनी गोदावरी नदीला गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नसल्याने कोरडेठाक पात्र पाहणाऱ्या नाशिककरांना रविवारी दिलासा मिळाला. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने दुथडी भरून वाहणारी गोदावरी बघून ऐन उन्हाळ्यात थंडावा जाणवला, परंतु हा दिलासा नाशिककरांना असला तरी लाभ मात्र नगरकरांना होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता आणि कोपरगावसाठी हे पाणी सोडण्यात आले आहे.
नाशिक : जीवनदायिनी गोदावरी नदीला गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नसल्याने कोरडेठाक पात्र पाहणाऱ्या नाशिककरांना रविवारी दिलासा मिळाला. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने दुथडी भरून वाहणारी गोदावरी बघून ऐन उन्हाळ्यात थंडावा जाणवला, परंतु हा दिलासा नाशिककरांना असला तरी लाभ मात्र नगरकरांना होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता आणि कोपरगावसाठी हे पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीला गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नसल्याने पात्र अत्यंत अस्वस्थ करणारे दिसत होते. या रामवाडी परिसरात नदी पात्र कधीही कोरडे दिसले नाही, त्या भागात नदीपात्राचे मैदान झाल्याने मुलांनी त्यावर क्रिकेटचा आनंदही लुटला, तर काही ठिकाणी नदीपात्रातील साचलेल्या पाण्यावर पाणवेली आणि अन्य वनस्पती दिसल्याने निळ्या पाण्याऐवजी चक्क हिरवे गालीचे अंथरलेले दिसत होते. नदीचे हे भीषण स्वरूप बघून नाशिककर अस्वस्थ होत होते. त्यामुळे नदीचे साचलेपण जाण्यासाठी गोदापात्र प्रवाही राहिली पाहिजे, अशी मागणीही होत होती. त्याच दरम्यान, रविवारी गोदावरी नदीला मोठ्याप्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने रामकुंड परिसरात नागरिकांची धावपळ उडाली तर भरलेले नदीपात्र पाहून नागरिक आणि पर्यावरणप्रेमी मात्र सुखावले. रामनवमीच्या दिवशी गोदावरीचे स्वरूप सुखद झाल्याने रामभक्तांनाही आनंद झाला आहे. एकादशीच्या दिवशी निघणाºया रामरथाच्या वेळी या रामकुंडातच मूर्तींना स्नान घातले जाते. नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मात्र काही प्रमाणात गोदाकाठी असलेल्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. सदरचे पाणी सोडल्यानंतर नाशिककरांना दिलासा मिळाला असला तरी मुळातच हे पाणी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता आणि कोपरगाव येथील कालव्यांसाठी सोडण्यात आले असून, तेथील शेतीला त्याचा लाभ होणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.