नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी दीड हजार पोलीस; बॉम्ब शोधक पथकाकडून मार्गाची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 11:43 AM2019-09-12T11:43:15+5:302019-09-12T11:43:44+5:30
शहरातून सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळांच्या वतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
नाशिक: अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि.११) लाडक्या बाप्पांना निरोप दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातून सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळांच्या वतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाकडून संपूर्ण शहरात दीड ते पावणेदोन हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पूर्वसंध्येला पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचा-यांनी मिरवणूक मार्गावर संचलन केले.
तसेच बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून मिरवणूक मार्ग तपासणी केली जात आहे.
तसेच शहरात मागील दहा दिवसांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह पहावयास मिळत होता. गुरुवारी गणेश विसर्जन असल्याने शहरात सर्वत्र बाप्पाला निरोप देण्यासाठी लगबग सकाळपासून दिसून येत आहे. पारंपरिक मार्गावरून दुपारी 12 वाजता काढण्यात येणारी मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांची गर्दी लोटण्याची शक्यता आहे. वाकडी बारव ते म्हसोबा महाराज पटांगणापर्यंत चालणा-या विसर्जन मिरवणुकीत विविध गणेशोत्सव मंडळांसह ढोलपथक, लेजीम पथक सहभागी होणार आहेत. एकूण 21 सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.
विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, तसेच शहरात सर्वत्र उत्साहात आणि शांततेत बाप्पाला नागरिकांना निरोप देता यावा, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. वाकडी बारव ते म्हसोबा पटांगण, बिटको चौक ते दारणा नदीपात्र आणि शिवाजी चौक ते दारणा नदी या मिरवणूक मार्गांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. मिरवणूकमध्येसहभागी होणा-या वाहनांची प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
असा असेल बंदोबस्त:
पोलीस उपआयुक्त- ४, सहायक पोलीस आयुक्त- ९, पोलीस निरीक्षक- ३२, उपनिरीक्षक- ११७, कर्मचारी- १,४७५, महिला कर्मचारी- ३३३, पुरु ष व महिला गृहरक्षक दलाचे जवान- ५८०, स्ट्रायिकंग फोर्स- ८ तुकड्या, राज्य राखीव दल- १ तुकडी, जलद प्रतिसाद पथक- १ तुकडी, दंगल नियंत्रण पथक- २ तुकड्या असा चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे.