भूमिअभिलेख विभागाच्या शिरस्तेदारासह एकास पकडले रंगेहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 01:36 AM2021-11-24T01:36:42+5:302021-11-24T01:38:50+5:30
येवला येथील भूमिअभिलेख कार्यालयातील शिरस्तेदारासाठी लाच स्वीकारताना खासगी इसमास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
येवला : येथील भूमिअभिलेख कार्यालयातील शिरस्तेदारासाठी लाच स्वीकारताना खासगी इसमास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
तालुक्यातील रहाडी येथील तक्रारदार यांच्या पोट खराब शेती क्षेत्रावर लागवड योग्य शेती क्षेत्राची आकारणी करून त्याबाबतचा अहवाल तहसीलदार कार्यालयास सादर करण्याकरिता शिरस्तेदार मुजफ्फर शेख (रा. प्रेसिडेंट गार्डन, भाभा नगर, नाशिक) यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पाच हजार रुपये लाचेची रक्कम पहिला हप्ता म्हणून शेख यांच्या सांगण्यावरून खासगी इसम सय्यद अब्दुल कादिर अन्सारी (चहा विक्रेता, रा. कमानीपुरा, जुनी कचरीजवळ, येवला) यांनी पंचासमक्ष मंगळवारी (दि.२३) स्वीकारली असता त्यांना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक सतीश डी. भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, सह सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज पळशीकर, पोलीस नाईक प्रवीण महाजन, चंद्रशेखर मोरे, चालक हेड कॉन्स्टेबल विनोद पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणी शिरस्तेदारासह खासगी इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.