एकलहरेत शेतीकामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:35 AM2019-07-17T00:35:39+5:302019-07-17T00:36:10+5:30
एकलहरे परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामांना वेग आला असून, भाजीपाल्याची मशागत, खरीप पिकांची पेरणी, वेलवर्गीय भाज्यांची छाटणी या कामात शेतकरी व्यस्त आहेत.
एकलहरे : परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामांना वेग आला असून, भाजीपाल्याची मशागत, खरीप पिकांची पेरणी, वेलवर्गीय भाज्यांची छाटणी या कामात शेतकरी व्यस्त आहेत.
एकलहरे परिसरात गेल्या आठवड्यात पुनर्वसूच्या पहिल्या चरणात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतात चांगली ओल निर्माण झाली. आता पावसाने उघडीप दिल्याने जमिनीत चांगला वाफसा निर्माण झाला आहे. आधीच तयार केलेल्या शेतात आता सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग, तागाची पेरणी शेतकरी करू लागले आहेत. भाताची रोपे टाकून पंधरा दिवस झाले आहेत.अजून महिनाभरात भाताची रोपे लागवडीस येतील. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी वेलवर्गीय दुधी भोपळा, कारली, गिलकी ही पिके घेतली आहेत. सध्या प्राथमिक
अवस्थेतील द्राक्ष बागेत आंतरपिक म्हणून अनेकांनी दुधी भोपळ्याची लागवड केली आहे. या दुधी भोपळ्याची आंतर मशागत, फवारणी, शेडाबाळीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
द्राक्षबागा जोमात
एकलहरे परिसरातील कोटमगाव, सामनगाव, चाडेगाव, जाखोरी, हिंगणवेढे, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी या परिसरात द्राक्षबागा जोमात बहरल्या आहेत. सध्या चांगला पाऊस पडला असल्याने द्राक्षबागेच्या काड्यांचे पोषण होऊन जोमाने वाढ होत आहे. द्राक्षबागेची काडी धरण्याचा हा हंगाम असल्याने काडीचे पोषण चांगले झाले की पुढे फळधारणा भरपूर व चांगली होते. त्यानंतर आॅक्टोबर छाटणी होऊन द्राक्षमणी भरण्यास मदत होते, असे शेतकरी सांगतात.