चंदनाची झाडे तोडणाऱ्यास रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:16 AM2021-02-09T04:16:39+5:302021-02-09T04:16:39+5:30
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वासाळी गावातील शेतकरी देवराम भावले यांच्या मळ्यात चंदनाची झाडे आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास तिघा ...
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वासाळी गावातील शेतकरी देवराम भावले यांच्या मळ्यात चंदनाची झाडे आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास तिघा चंदन तस्कारांची टोळी चंदनाची महागडी लाकडे चोरी करण्यासाठी आली होती. परंतु भावले परिवाराला आवाज आल्याने ते बाहेर आले. त्यांनी चंदनाच्या झाडाजवळ कोणीतरी उभे असल्याचे पाहिले. चाहूल लागताच चंदनचोरांपैकी दोघांनी पळ काढला. तर एक जण झाडाजवळ सापडला. त्याला देवराम भावले, पांडुरंग भावले यांनी पकडले. या चंदनचोरांनी बरेच चंदनाचे खोड तोडले होते. याबाबत सातपूर पोलिसांना कळविले असता पहाटेच्या सुमारास ताबडतोब पोलीस पथक शेतात दाखल झाले. चंदनाचे झाड तोडण्यासाठी लागणारे साहित्यासह एकास ताब्यात घेऊन सातपूर पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून दोन मोबाइलदेखील जप्त करण्यात आले. एक संशयित चंदन तस्कर पकडल्या गेल्याने शहर भरातील अनेक चंदन तस्करीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसानी वर्तविली आहे. आधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.