एकाला ठेका, दुसऱ्याला ठेंगा!‘
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2016 12:21 AM2016-04-01T00:21:48+5:302016-04-01T00:29:10+5:30
स्थायी’चे अजब तर्कट : विनानिविदा पत्राच्या आधारे काम देण्याचा प्रकार
नाशिक : किरकोळ कामांसाठी ई-निविदेचा आग्रह धरणाऱ्या प्रशासनाने फाळके स्मारक व बुद्धविहारच्या स्वच्छतेचा सुमारे ५४ लाख रुपयांचा ठेका केवळ एका पत्राच्या आधारे विनानिविदा देण्यासंबंधीचा ठेवलेला प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला, मात्र वाहनचालक सेवा पुरविण्याचा सुमारे दीड कोटी रुपयांचा ठेका काळ्या यादीत असलेल्या ठेकेदाराला देण्याचा विषय अंगाशी येण्याची शक्यता लक्षात येताच त्याला खुबीने बगल देत प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. दोन्हीही कामे विनानिविदा देण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव असल्याने विरोधकांनी सभापतींसह प्रशासनालाही त्याचा जाब विचारला. ‘एकाला ठेका, दुसऱ्याला ठेंगा’ दाखविण्याचा हा प्रकार पाहून स्थायीच्या अजब तर्कटाबद्दल विरोधी सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
महापालिका स्थायी समितीवर सदस्य व सभापतीच्या निवडीनंतर झालेल्या पहिल्याच सभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची कोंडी केली. फाळके स्मारक व बुद्धविहार येथील साफसफाई व उद्यान संवर्धनासाठी मे. बनकर सिक्युरिटी प्रा. लिमिटेड या मक्तेदाराला नवीन निविदाप्रक्रिया होऊपर्यंत काम देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीवर ठेवला होता. स्मारकातील यापूर्वीच्या मक्तेदाराने काम करण्यास असमर्थता दर्शविल्याने बनकर सिक्युरिटीला काम देण्याची शिफारस प्रशासनाने केली असता प्रकाश लोंढे, दिनकर पाटील, मनीषा हेकरे यांनी त्यास हरकत घेतली. साध्या पत्राच्या आधारे विनानिविदा काम करण्याचा हा प्रकार बेकायदेशीर असल्याने चुकीचा पायंडा पाडू नका, असे प्रकाश लोंढे यांनी सांगितले, तर दिनकर पाटील यांनी काम न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. विरोधकांनी जाब विचारण्यास सुरुवात केली असताना सत्ताधारी मनसेचे यशवंत निकुळे व सुरेखा भोसले यांनी बचाव करत सदर ठेका देणे किती आवश्यक आहे, याचे विश्लेषण केले. अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, नवीन निविदा काढण्यासाठी महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु महासभेकडून ९० दिवसांत ठराव प्राप्त न झाल्याने शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले. अद्याप मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही.
कामासंबंधी काही ठेकेदारांना विचारणा केली; परंतु त्यांनी असमर्थता दर्शविली. एकाने तयारी दर्शविली म्हणून प्रस्ताव ठेवल्याचे सोनवणे यांनी सांगितले. सभापती सलीम शेख यांनी नव्याने निविदाप्रक्रिया राबविली जात नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदारास काम देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. याचवेळी मनपाची वाहने चालविण्यासाठी वाहनचालकांची सेवा पुरविण्याचे सुमारे १ कोटी ४० लाख रुपयांचे काम मे. विशाल सर्व्हिसेस यांच्याकडून विनानिविदा करून घेण्याचाही प्रस्ताव आयुक्तांनी स्थायीवर ठेवला होता. या प्रस्तावालाही विरोधकांनी हरकत घेत त्यात मुदतवाढीचा कुठलाही उल्लेख नसल्याचे निदर्शनास आणून दिले. प्रकाश लोंढे यांनी सदर मक्तेदार हा काळ्या यादीत आहे काय, असा सवाल उपस्थित केला. सदर मक्तेदार हा घंटागाडी ठेक्यात काळ्या यादीत असल्याने प्रस्तावास मंजुरीचा प्रकार अंगलट येण्याचे लक्षात येताच सत्ताधारी मनसेचे यशवंत निकुळे, सुरेखा भोसले यांनी प्रस्ताव नामंजूर करण्याची सूचना केली. सभापती सलीम शेख यांनीही प्रस्ताव नामंजूर करत निविदाप्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. दोन्ही विषय एकाच प्रकारचे असताना गोंधळलेल्या सत्ताधाऱ्यांनी एकाला ठेका देताना दुसऱ्याला ठेंगा दाखविला. (प्रतिनिधी)