शंभर वर्षांची साक्षीदार रुंग्टा शाळा टाकणार कात
By admin | Published: July 14, 2017 01:34 AM2017-07-14T01:34:55+5:302017-07-14T01:35:14+5:30
नाशिक : रुंग्टा शाळेचे पुनर्निर्माण कामास सुरुवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शंभर वर्षांची परंपरा असणाऱ्या, नाशिकभूषण कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर, प्रख्यात भारतीय क्रि केटपटू बापू नाडकर्णी, थोर शेतकरी नेतृत्व शरद जोशी यांच्यासारख्या दिग्गजांना घडवणाऱ्या रुंग्टा शाळेचे पुनर्निर्माण कामास सुरुवात झाली आहे. जुनी शाळा पाडून त्या जागेवर आधुनिक स्वरूपाची प्रशस्त शाळा बांधण्यात येणार आहे. बुलडोझरच्या सहाय्याने जुने बांधकाम पाडण्यात येत असून, पुनर्निर्माण कामास लवकरच प्रारंभ होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी विद्यार्थी ई-लर्निंग सुविधा असणाऱ्या अत्याधुनिक शाळेत शिक्षणाचे धडे गिरवू शकणार आहेत.
काळानुरूप इमारत जीर्ण झाल्यामुळे संस्थेच्या वतीने शतकमहोत्सवी वर्षात त्या जागेवर नवीन इमारत उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नवीन इमारत ही तळमजला आणि त्यावर दोन मजले अशा तीन मजली स्वरूपात राहणार आहे. अत्याधुनिक स्वरूपाचे प्रशस्त असे एकूण ३० वर्ग या शाळेत असतील. लायब्ररी तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळेसह परिपूर्ण इमारत उभारण्यात येणार आहे. त्यात एका सत्रात मुलांचे सर्व वर्ग आणि दुसऱ्या सत्रात मुलींचे सर्व वर्ग अशी त्याची रचना राहणार आहे. सध्या शाळेतील प्रशासकीय इमारत, अर्ध्या शाळेचे भाग पाडण्यास सुरुवात केली असून, तेवढ्या भागास पत्र्यांचे कम्पाउंड करून तो भाग बंदिस्त करण्यात आला आहे. शाळेतील मागील भागातील उर्वरित इमारतीत वर्ग सुरू आहेत. सकाळ सत्रात मुलांचे वर्ग, दुपार सत्रात मुलींचे वर्ग असे नियोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या अध्ययनात कोणताही अडथळा येणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. पाडलेल्या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित शाळेचे पाडकाम आणि पुनर्निर्माणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.