नाशिकमध्ये ४ अपघातात एक युवक ठार, मायलेकीसह दोन महिला जखमी
By अझहर शेख | Published: October 23, 2023 05:08 PM2023-10-23T17:08:45+5:302023-10-23T17:09:02+5:30
आयशरच्या धडकेत मातोरीचा दुचाकीस्वार तरुण किरण संतोष वड (२०) याचा मृत्यू झाला.
नाशिक : भरधाव पिकअप जीप, आयशर, रिक्षा आणि दुचाकीच्या चालकांनी वेगवेगळ्या ठिकाणी बेदरकारपणे वाहने चालवत अपघाताला कारणीभूत ठरल्याच्या घटना घडल्या. यामध्ये मातोरीचा तरुण ठार झाला तर चार महिला जखमी झाल्या आहेत. आयशरच्या धडकेत मातोरीचा दुचाकीस्वार तरुण किरण संतोष वड (२०) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळसह मुंबईनाका, अंबड, पंचवटी पोलिस ठाण्यात वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पेठ रस्त्यावर भरधाव आयशर ट्रकच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रविवारी (दि. २२) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वार किरणला धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. अपघातानंतर आयशर ट्रकचालक घटनास्थळाहून फरार झाला आहे. या गुन्ह्यात फरार ट्रकचालकाविरुद्ध पोलिस शिपाई योगेश पवार (३५) यांनी फिर्यादी होत म्हसरूळ पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या दुर्घटनेत पंचवटी परिसरातील अमृतधाम चौफुलीजवळ भरधाव पिकअपच्या धडकेत महिला प्रवासी आरती विशाल जाधव (४२, रा. पंचवटी) या जखमी झाल्या आहेत. जाधव यांच्या फिर्यादीवरून पिकअप जीप (एमएच २३ एव्ही ५३४०)च्या अज्ञात चालकाविरुद्ध पंचवटी पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत उंटवाडी येथील दोंदे पुलाजवळ भरधाव दुचाकीने पादचारी महिला योगिता वसंत दातार (५९, रा. उंटवाडी) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. अंबड पोलिस ठाण्यात दुचाकी (एमएच १५, ईव्ही १४५९)च्या अज्ञात स्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीस्वार मायलेकी बालंबाल बचावल्या
भरधाव रिक्षा चालकाने ओव्हरटेक करताना खोडेनगर कॉलनी रस्त्यावर भरधाव रिक्षा (एमएच १५, एफयू ७६८३) चालवत ओव्हरटेक करत ॲक्टिव्हा दुचाकीस्वार महिलांना धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार मनीषा कनिलाल पाटील (३५) व अंजली कनिलाल पाटील (१५, दोघीही रा. खोडेनगर) या मायलेकी जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक सुनील बहिरम यांनी फिर्याद देत मुंबईनाका पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाविरूद्ध मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.