बळीराजा मेटाकुटीला! ढगाळ वातावरणामुळे कांद्याची लाली, द्राक्षाचा गोडवा धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 12:39 PM2022-01-23T12:39:45+5:302022-01-23T12:50:13+5:30
येवला/मानोरी : नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि.२२) सकाळपासून अचानक पुन्हा आकाशात मोठ्या प्रमाणात ढग दाटून आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर ...
येवला/मानोरी : नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि.२२) सकाळपासून अचानक पुन्हा आकाशात मोठ्या प्रमाणात ढग दाटून आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा विचित्र खेळ प्रत्येक महिन्याला बळीराजाला अनुभवायला मिळत असून कधी ढगाळ वातावरण, कधी दाट धुके तर कधी अवकाळी पावसामुळे यंदा शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. गहू ,हरभरा सारख्या पिकांवर माव्याचा प्रादुर्भाव झाला असून उन्हाळ कांदा लागवडीवर दाट धुके तर ढगाळ वातावरणामुळे कांदे पिवळसर पडत चालले आहेत. रब्बी हंगामातील पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या दराने औषधे खरेदी करून पिकांवर फवारणी करून पिके जगविण्याची वेळ आली आहे.
येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड, जळगाव नेऊर, शिरसगाव, पिंपळगाव लेप, जऊळके आदी परिसरात अवकाळी पाऊस तसेच खराब वातावरणामुळे रोपांचे अतोनात नुकसान झाल्यानंतर नव्याने रोपे विकत घेऊन उन्हाळ कांदा लागवड करण्यात शेतकरी व्यस्त आहे; मात्र ही नव्याने केलेली कांदा लागवड ढगाळ वातावरण, दाट धुके आणि अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडली असून कांद्याचे शेंडे पिवळसर पडण्याच्या भीतीने शेतकरी वर्गाकडून औषध फवारणी केली जात असून मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक ठिकाणी लाल कांदा काढणीला आला असून, काही ठिकाणी सुरुवात देखील केली आहे. अशातच या अवकाळी पावसाच्या धास्तीने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला असल्याचे सर्वत्र दिसून आले आहे.
सतत औषध फवारणी
ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील पूर्णतः धास्तावला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा हंगाम हा अंतिम टप्प्यात आला असून पुढील काही दिवसात द्राक्ष फळ तोडणीला सुरुवात होणार आहे. वातावरणातील बदलामुळे सातत्याने औषध फवारणी करून द्राक्ष बाग जगवलेली असताना आता चांगल्या प्रकारे फळे लागली असून हवामान खात्याने यानंतर ही पुढील दोन महिन्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज देखील वर्तवल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच त्रेधा उडाली आहे.