मनमाड बाजार समितीत कांद्याची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 12:17 AM2020-12-10T00:17:22+5:302020-12-10T00:18:51+5:30
मनमाड: येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गेल्या सोमवारच्या तुलनेत बुधवारी (दि.९) शेतमालाची आवक घटली आहे.
मनमाड: येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गेल्या सोमवारच्या तुलनेत बुधवारी (दि.९) शेतमालाची आवक घटली आहे. कृषी कायद्याच्या विरोधात मंगळवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनामुळे मनमाड बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बंद नंतर बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढेल असा अंदाज असला तरी बुधवारी मात्र शेतमालाची आवक कमी झाली आहे.
सोमवारी उन्हाळ कांद्याला सरासरी १७००, तर लाल कांद्याला २४०० रुपये दर मिळाला होता. बुधवारी बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला २४५९, तर लाल कांद्याला २७०० रुपये बाजारभाव मिळाला.
मनमाड बाजारात समितीमध्ये सोमवार ते शुक्रवार धान्य लिलाव होत असतात. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीमध्ये मक्याची चांगली आवक झाली आहे. सध्या बाजार समितीत सर्वत्र मका दिसत असून, इतर धान्य किरकोळ प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. बाजार समितीत होणाऱ्या सर्व व्यवहारावर करडी नजर ठेवण्यात येत आहे
यावर्षी अतिवृष्टीमुळे लाल कांद्याचे नुकसान झाल्याने उत्पादन कमी निघाले असल्याने बाजार समितीमध्ये आवक घटली आहे. नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे
- योगेश पुंडलिक आहेर, भालूर
यावर्षी बदलत्या हवामानामुळे कांदा रोपांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांना कांदा बियाणे वेळोवेळी ज्यादा दराने खरेदी करावे लागले. त्यानंतरही निसर्गाच्या लहरीपणामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे.
- कौतिक हारदे, मोहेंगाव