लासलगावी पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 01:45 PM2023-08-25T13:45:27+5:302023-08-25T13:46:15+5:30
आज २६४ वाहनातील कांद्याचे लिलाव ६०० ते २४१७ व सर्वसाधारण २१५० या भावाने करण्यात आला.
- शेखर देसाई
लासलगाव (जि. नाशिक) : येथील बाजार समितीत आज शुक्रवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाले. लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलीस बंदोबस्त लिलावाच्या ठिकाणी तैनात करण्यात आला हाेता.लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्याच्या तयारीत पोलीस होते.
आज २६४ वाहनातील कांद्याचे लिलाव ६०० ते २४१७ व सर्वसाधारण २१५० या भावाने करण्यात आला. सकाळच्या सत्रात आलेली सर्व वाहनांचा लिलाव लासलगाव बाजार समितीने केला असून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जाहीर केल्याप्रमाणे नाफेडने मात्र आज कोणत्या प्रकारची कांदा खरेदी सुरू केलेली नाही. वास्तविक पाहता लासलगाव बाजारपेठ जागतिक कांदा बाजारपेठ आहे यापूर्वी कोणतीही शासकीय खरेदी सर्वप्रथम लासलगाव होत असे, परंतु नाफेडने मागील शासकीय कांदा खरेदी उमराणा येथून सुरू केली होती. त्याबद्दल कांदा उत्पादकांमध्ये नाराजी आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पत्रकार परिषद जाहीर केल्याप्रमाणे अद्याप लासलगाव तरी कांदा खरेदी सुरू झालेली नाही.
नाफेडकडून खरेदी नाही
नाफेडने जाहीर करूनही बाजारावर प्रत्यक्ष खरेदी सुरू केलेले नाही यावरून टिकेची झोड उठवली जात आहे. म्हणून तातडीने नाशिक जिल्ह्यातील काही बाजारांवर खाजगी प्रोडूसर कंपन्यांमार्फत खरेदी करण्याचा निर्णय तातडीने घेतल्याचे समजते. सभापती बाळासाहेब क्षिररसागर आणि सचिव नरेंद्र वाढवणे यांनी कांदा लिलावात सातत्य राहिल्यास कांदा वेळेवर विक्री होणे आवश्यक आहे, त्यामुळे ज्यांना कांदा भाव बाबत आपले म्हणणे मांडायचे असल्यास बाजार समितीत लेखी स्वरूपात सादर करावे, अगर महसूल अधिकार्यांकडे सादर करावे परंतु लिलाव बंद करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन केले आहे.