नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद
By प्रसाद गो.जोशी | Published: September 20, 2023 02:54 PM2023-09-20T14:54:39+5:302023-09-20T14:55:36+5:30
ऐन सणासुदीच्या तोंडावर आणि दुष्काळाचे सावट असताना पुन्हा बाजार समित्या बेमुदत बंद झाल्या असल्याने कांद्यासह इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे.
शेखर देसाई
लासलगाव : नाशिक जिल्हा कांदा व्यापारी वर्गाच्या समस्यांबाबत व्यापारी असोसिएशनने विविध मागण्यांकरिता मुख्यमंत्री व पणन मंत्री यांना मागण्यांबाबतचे निवेदन सादर केलेले आहे. नाशिक येथील जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे लासलगाव सह जिल्ह्यातील सतरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव बेमुदत बंद झाले आहेत. यामुळे एका दिवसाला साधारणतः ३० ते ४० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
ऐन सणासुदीच्या तोंडावर आणि दुष्काळाचे सावट असताना पुन्हा बाजार समित्या बेमुदत बंद झाल्या असल्याने कांद्यासह इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या मागण्या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कुठलाही सकारात्मक तोडगा न निघाल्याने जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समिती बंद झाल्या असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे. व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने आजपासून कांदयाच्या लिलावांवर व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे .