कांद्याने आणले डोळ्यात पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:24 AM2021-03-13T04:24:59+5:302021-03-13T04:24:59+5:30

नाशिक : राज्यासह देशांतर्गत उन्हाळी कांद्याची आवक होण्यास सुरुवात झाल्याने कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या ...

Onion brought tears to the eyes! | कांद्याने आणले डोळ्यात पाणी !

कांद्याने आणले डोळ्यात पाणी !

Next

नाशिक : राज्यासह देशांतर्गत उन्हाळी कांद्याची आवक होण्यास सुरुवात झाल्याने कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या पंधरवड्यात चार हजार रुपये क्विंटल दराने विक्री होणाऱ्या कांद्याला १,३०० ते १,५०० रुपये इतका सर्वसाधारण दर मिळत असल्याने जिल्ह्यातील लासलगाव, सिन्नर, उमराणे व येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सिन्नरमधील उत्पादकांना तोटा

दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या सिन्नर तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील पाणीटंचाई दूर झाली. मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी चांगले पैसे मिळतील, या आशेने कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात हवामानातील बदलामुळे कांदा पिकावर करप्यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र, गत पंधरवड्यात कांद्याचे दर ४ हजारांवर गेल्याने कमी उत्पादनातही चांगले पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद जास्त काळ टिकला नाही. राज्यासह परराज्यातील उन्हाळी कांद्याची आवक सुरू होताच कांद्याचे दर कमी होण्यास सुरूवात झाली. गत आठवड्यात २,२०० ते २,५०० रुपयांवर आलेले कांद्याचे भाव या आठवड्यात निम्म्यावर आल्याने सिन्नर बाजार समितीत सध्या १,३०० ते १,५०० रुपये इतका कमी दर कांद्याला मिळत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच्या बाजारभावाची तुलना करता, शेतकऱ्यांना क्विंटलमागे अडीच ते तीन हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

येवला : लाल कांद्याच्या दरात घसरण

मानोरी : केंद्र सरकारने कांदा निर्यात उठवल्यानंतर कांद्याला चांगल्याप्रकारे भाव मिळत असताना शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. बाजार समित्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाळी आणि लाल कांद्याच्या दरात विक्रमी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर पुन्हा गडगडले असून, दर पुन्हा हजार रुपयांच्या आत आले आहेत. उन्हाळी कांद्याला किमान ९०० रुपये तर सरासरी १,१०० रुपये प्रतिक्विंटल तर लाल कांद्याला किमान ८०० रुपये तर सरासरी एक हजार रुपये प्रतिक्विंटल इतका कमी भाव मिळाला असून, कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

उन्हाळी आणि लाल कांदा लागवडीत विक्रमी वाढ झाली असून, यंदा अवकाळी पावसामुळे रोपांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मिळेल तेथून कांद्याची रोपे विकत घेऊन कांद्याची लागवड पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची कांद्याच्या बियाण्यांमध्ये फसगत झाल्याचे शेतकऱ्यांकडूनच सांगितले जात आहे.

दरम्यान, कांद्याच्या दरात सातत्याने मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने उन्हाळी आणि लाल कांदा काढणीला वेग आला असून, कांद्याचे दर अजून किती कमी होतील, याची शाश्वती नसल्याने बाजार समित्यांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असून, आवक दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. उष्णता दिवसेंदिवस वाढतच असल्याने विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून, उन्हाळी कांद्याला देण्यासाठी मुबलक पाणी विहिरीत नसल्याने शेतकऱ्यांकडून पालखेड आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. उन्हाळी कांद्याला अद्यापही चार ते पाच पाणी मुबलक प्रमाणात देणे गरजेचे असून, पालखेड आवर्तनातून वितरिका क्रमांक २१, २५ व २८ला आवर्तन तत्काळ सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Web Title: Onion brought tears to the eyes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.