निफाड तालुक्यातील रुई येथे ५ जूनला कांदा परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 01:53 AM2022-06-03T01:53:56+5:302022-06-03T01:54:32+5:30
सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला खूप कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या मुद्द्यावरून रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेत निफाड तालुक्यात रविवारी निफाड तालुक्यातील रुई गावात कांदा परिषद घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांनी दिली आहे.
नाशिक : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला खूप कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या मुद्द्यावरून रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेत निफाड तालुक्यात रविवारी निफाड तालुक्यातील रुई गावात कांदा परिषद घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांनी दिली आहे. शासकीय विश्रामगृहात गुरुवारी (दि. २) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ५ जूनला ही कांदा परिषद होणार असून, संघटनेच्या जागर शेतकऱ्याचा आक्रोश कांदा उत्पादकांचा या अभियानांतर्गत आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी या कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही पगार यांनी नमूद केले. निफाड तालुक्यामध्ये रुई या गावात यापूर्वी १९८२ मध्ये शरद जोशी यांच्या नेतृत्वात कांदा परिषद झाली होती. त्यानंतर सटाणा येथे २०१३ मध्ये दुसरी व आता पुन्हा रुई येथे तिसरी राज्यस्तरीय कांदा परिषद होणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल पवार यांनी सांगितले. दरम्यान, या कांदा परिषदेला माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे नेते किरीट सोमय्या व विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.