विहिरींनी तळ गाठल्याने कांदा संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 08:02 PM2021-03-05T20:02:38+5:302021-03-06T00:38:11+5:30
जळगाव नेऊर : उन्हाळ्याची चाहूल लागल्याने व आठ दिवसाला कांद्याला पाणी द्यावे लागत आहे, त्यातच विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांचा कांदा आवर्तनाचे वाट पाहत आहे. आवर्तन सुटल्यास हजारो हेक्टरवरील कांद्याला संजीवनी मिळणार असून त्वरित आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कष्टाने लावलेला उन्हाळ कांदा जगविण्यासाठी शेतकरी पाण्याची वाट पाहत असून कालवा उशिरा सुटल्यास हजारो हेक्टरवरील कांदा संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तेव्हा शेतकरी मात्र आवर्तनाचे वाट पाहत आहे. कडक उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे अचानक विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांचा कांदा होरपळत आहे. हजारो रुपये केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत असताना हातातोंडाशी आलेला घास मात्र पालखेड डावा कालव्याचे उशिरा आवर्तनाने वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आवर्तन सोडून वितरीकांना पाणी सोडावे, अशी मागणी जळगाव नेऊर, पुरणगाव, जवळके, पिंपळगाव लेप, परिसरातील शेतकरी करत आहे.
उशिरा लागवड संकटात
यावर्षी शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी रोपांअभावी व मजुरांअभावी उशिरा झाल्या, त्यामुळे आता उन्हाची चाहूल लागली असल्याने आठ दिवसाला पाणी द्यावे लागत असल्याने व विहिरींनी तळ गाठल्याने सर्व आशा पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून आहे.