येवला तालुक्यात कांदा लागवडीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:19 AM2021-08-25T04:19:15+5:302021-08-25T04:19:15+5:30
जळगाव नेऊर : मघा नक्षत्रात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या खोळंबलेल्या कांदा लागवडीला सुरुवात झाली असून, जवळपास ६५३ हेक्टरवर पोळ कांदा ...
जळगाव नेऊर : मघा नक्षत्रात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या खोळंबलेल्या कांदा लागवडीला सुरुवात झाली असून, जवळपास ६५३ हेक्टरवर पोळ कांदा लागवड झाली आहे.
तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पोळ कांदा लागवड होत असते तर पश्चिम भागात मागील वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी बुरशीजन्य रोगाने उद्ध्वस्त झाल्याने यावर्षी मात्र शेतकऱ्यांनी खरिपातील सोयाबीन, मका, भाजीपाला पिकांमध्ये वाढ केल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी कमी प्रमाणात क्षेत्र ठेवले आहे. पर्यायाने येवला तालुक्यात अनेक भागात कांदा लागवडी सुरू झाल्याचे चित्र सध्या दिसत असून, मागील आठवड्यात पडलेल्या पावसाने पिके तरारली असली तरी कुठे विहिरींना पाझर फुटला तर कुठे विहिरी, शेततळे मात्र कोरड्याठाक आहेत, तसेच अनेक शेतकऱ्यांची रोपे झडपावसाने खराब झाल्याने भविष्यात रोपांची टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी पोळ कांद्यासाठी खरीप पिकांना फाटा देऊन जमीन पडीक ठेवतात, पण गेल्या एक-दोन वर्षांचा अनुभव पाहता पोळ कांद्यावर येणारी विविध संकटे बघता शेतकऱ्यांनी खरिपातील मका, सोयाबीन या पिकांबरोबरच भाजीपाला पिकांची जोड दिल्याने व मोठ्या प्रमाणात तरुण शेतकऱ्यांचा शेती करण्याकडे कल वाढल्याने अनेक तरुण शेतकऱ्यांनी ढोबळी मिरची, टोमॅटो, तिखट मिरची, कोबी, फ्लॉवर, काकडी, कारले या पिकांची लागवड करून, तरुण शेतकऱ्यांनी लिक्विड खते, रासायनिक खते तसेच विविध प्रयोग करून भाजीपाला पीक उत्तम प्रतीचे बनविले आहे.
भाजीपाला पीक हे नाशवंत असल्याने कधी उत्पादन जास्त तर कधी उत्पादन कमी, यामुळे याचा फटका शेतकऱ्यांच्या शेतमाल बाजारभावाला बसत असतो. यावर्षी मात्र मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकात वाढ झाल्याने व उत्पादन मोठ्या प्रमाणात निघाल्याने शेतकऱ्यांना पाहिजे, तसा बाजारभाव मिळत नसल्याने अनेक पिकातून शेतकऱ्यांचा खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.
दरवर्षी कांदा लागवड करणाऱ्या मजुरांकडे शेतकऱ्यांची झुंबड असायची, पण नुकत्याच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, थंडावलेल्या कांदा लागवडीला सुरुवात झाली असून, सप्टेंबर महिन्यात बाजरी, मूग पिके सोंगणीनंतर कांदा लागवडीत वाढ होण्याची शक्यता असली तरी गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने व पाण्याची कमतरता असल्याने त्याचा परिणाम कांदा लागवडीवर होत आहे.
मागील आठवड्यात सोळा तारखेपासून पडलेल्या पावसावर पिके तरारली असून, अनेक भागात विहिरी, शेततळे मात्र कोरड्याठाक असल्याने मुसळधार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
कोट...
मघा नक्षत्रात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी मशागती करून कांदा लागवडीला सुरुवात केली असून, चार-पाच दिवस झड पावसाने बुरशीजन्य रोगांमुळे रोपे खराब होत असून, रोपे खराब झाली तर रोपांची टंचाई निर्माण होऊ शकते.
- शरद सोनवणे, कांदा उत्पादक, कातरणी ता. येवला.
जळगाव नेऊर येथे सुरू असलेली कांदा लागवड