कांद्याची अर्थव्यवस्था उद््ध्वस्त
By admin | Published: October 10, 2014 11:42 PM2014-10-10T23:42:25+5:302014-10-10T23:49:31+5:30
कांद्याची अर्थव्यवस्था उद््ध्वस्त
मनमाड : कांद्याच्या बाबतीत आम्ही काहीही निर्णय घेतला नाही, असे म्हणणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेच कांद्याची अर्थव्यवस्था उद््ध्वस्त केली असल्याची घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला़ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे येवला व नांदगाव मतदारसंघातील उमेदवार छगन भुजबळ व पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ मनमाड येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. व्यासपीठावर छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तालुका अध्यक्ष बापूसाहेब कवडे, पंकज भुजबळ, विजयश्री चुंभळे, तुकाराम दिघोळे, मधुकर हिरे, गंगाधर बिडगर, साहेबराव पाटील आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.
गावित व पाचपुते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनीच त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या. आमच्याकडे असताना ते भ्रष्टाचारी होते तुमच्याकडे आल्यानंतर संत कसे झाले,असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला. दसऱ्याच्या दिवशी सरसंघचालकांचे भाषण दूरदर्शनवरून दाखवल्याच्या प्रकाराबद्दल बोलताना ते म्हणाले की हे सरकार मुठभर लोकांच्या हिताची जपणूक करणारे आहे. त्याच दिवशी नागपूर येथे सुरू असलेल्या दीक्षाभूमीवरील कार्यक्रमाचे महत्त्व दूरदर्शनला वाटले नसल्याची टीका त्यांनी केली.
सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता़ मनमाड पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता़ (वार्ताहर)