ट्विटरवरच उठली कांदा निर्यातबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 05:29 PM2020-02-28T17:29:23+5:302020-02-28T17:29:36+5:30
अधिसूचनेची प्रतीक्षा : मात्र कांदा दरात उसळी
लासलगाव : कांदा निर्यातबंदी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या एका ट्विटने उठल्याचे जाहीर झाले असले तरी अदद्याप त्यासंदर्भात कोणतीही अधिकृत अधिसूचना प्रसिदद्ध न झाल्याने संभ्रम कायम आहे. कांदा उत्पादकांपासून ते खरेदीदारांपर्यंत आता सर्वांनाच अधिकृत अधिसूचनेची प्रतीक्षा लागून राहिली आहे तर एका ट्विटमुळे बाजार समिती आवारात मात्र कांदा दराने उसळी घेतली आहे.
बुधवारी (दि.२६) सायंकाळी ७ वाजून १७ मिनिटांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न-नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी हिंदी मध्ये ट्विट करत तर ७ वाजून २८ मिनिटांनी इंग्रजीमध्ये ट्विट करत कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याचे संकेत दिले होते. मात्र, या चिवचिवाटाला चोवीस तास उलटून गेल्यानंतरही शुक्र वारी (दि.२८) दुपारपर्यंत कुठेही केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर अधिकृतपणे त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती. निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री पासवान यांच्या ट्विटचे स्क्र ीन शॉट सोशल मीडियावर फिरत असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात चारशे रु पयांची तेजी दिसून आली. कांद्याचे बाजार भावामध्ये वाढ झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले तर व्यापाऱ्यांमध्ये निर्यात खुली करण्याबाबत अद्याप पर्यंत अधिसूचना न निघाल्याने संभ्रमाचे वातावरण होते.
गेल्या नोव्हेबर आणि डिसेंबरमध्ये कांद्याच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर केंद्र सरकारने भाव नियंत्रणात आणण्यासाठी निर्यात बंदी घोषीत केली होती. त्यानंतर कांदा भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले. कृषी विभागाकडून केंद्राला मिळालेल्या आकडेवारीनुसार येणा-या हंगामामध्ये कांद्याचे विक्र मी उत्पादन होणार असल्यामुळे कांद्याचे दर कोसळू शकतात. त्यामुळे केंद्र सरकार तर्फे रामविलास पासवान यांनी ट्विट करत कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याचे संकेत दिले होते. मात्र अद्याप अधिसूचना जारी झालेली नाही.