पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानचा कांदा भारतात; नाशिकच्या कांद्याशी स्पर्धा

By दिनेश पाठक | Published: July 13, 2024 07:18 AM2024-07-13T07:18:11+5:302024-07-13T07:21:22+5:30

भारतात कांद्याचे वाढत असलेले दर अन् अफगानिस्तानमध्ये घसरलेले दर याचा फायदा घेत खासगी व्यापारी तिकडील कांदा भारतात आणून मालामाल बनू पाहत आहेत.

Onion from Afghanistan to India via Pakistan; Competition with Onion of Nashik | पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानचा कांदा भारतात; नाशिकच्या कांद्याशी स्पर्धा

पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानचा कांदा भारतात; नाशिकच्या कांद्याशी स्पर्धा

नाशिक- कांद्यावर केंद्र सरकारने लागू केलेले ४० टक्के निर्यातशुल्क, ‘नाफेड’चा तटपुंजा भाव या सगळ्या घोळात आता अफगाणिस्तानचा लाल कांदा पाकिस्तानमार्गे भारतात दाखल होत आहे. भारतात कांद्याचे वाढत असलेले दर अन् अफगानिस्तानमध्ये घसरलेले दर याचा फायदा घेत खासगी व्यापारी तिकडील कांदा भारतात आणून मालामाल बनू पाहत आहेत.

अमृतसर अन् दिल्लीच्या बााजरपेठेत या कांद्याने आपले बस्तान बसविले असून, लवकरच तो इतर बाजारपेठ काबीज करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे राजस्थानचा कांदा संपल्याने दिल्लीत नाशिकसह मध्य प्रदेशचा कांदा अधिक प्रमाणात जाऊ लागला आहे. या कांद्याची स्पर्धा दिल्लीच्या बाजारात अफगाणिस्तानच्या कांद्याशी होत आहे.

कांदा भारत सरकारच खरेदी करीत असल्याची शक्यता देशातील कांदा उत्पादकांनी व्यक्त केली होती; परंतु अधिक माहिती घेतली असता कांदा खासगी व्यापारीच थेट खरेदी करीत असल्याचे सांगण्यात आले. दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी पाकिस्तानच्या रस्त्याने अफगाणिस्तानचा कांदा आणला असून, २८ ते ३० रुपये किलो या भावाने तो पोच मिळाला आहे. तर भारतात कांद्याचे दर ४० ते ५० रुपये किलो झाले आहेत. त्यामुळे तिकडील कांदा मोठ्या व्यापाऱ्यांना परवडणारा आहे; मात्र नाशिकसह इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानच्या कांद्याला परवानगी देऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. दोन देशांमध्ये झालेल्या व्यापारी करारामुळे हा व्यवहार दोघा बाजूंच्या व्यापाऱ्यांना शक्य होत आहे; मात्र तिकडील कांदा जरी भारतात दाखल झाला असला तरी नाशिक अन् मध्य प्रदेशातील कांदा गुणवत्तेने भारी पडत असल्याने आपल्याकडील कांद्यालाच जास्त मागणी असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.

२०० टन कांदा दाखल

अफगाणिस्तानमधील ४० टनाचा एक अशा पाच ट्रकमधून २०० टन कांदा दिल्लीसह अमृतसरमध्ये विक्रीसाठी आला आहे. त्यात अजून वाढ होऊ शकते. हा कांदा ग्राहकांना २६ ते ३२ रुपये किलो भावाने विकला जाण्याची शक्यता आहे. रस्त्याने ट्रकमधून कांदा आणण्यासाठी करासह ट्रकचे भाडे ७५ ते ८५ हजार रुपयांपर्यंत देण्यात आले आहे. पाकिस्तानमार्गे वाघा बॉर्डर पास करून कांदा भारतात दाखल होत आहे.

Web Title: Onion from Afghanistan to India via Pakistan; Competition with Onion of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.