कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा विरोधी पक्षनेत्यांच्या निवासासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 08:02 PM2020-12-16T20:02:13+5:302020-12-17T00:49:55+5:30
लासलगाव : कांदा निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेलेल्या राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला प्रारंभी भेट नाकारताच शिष्टमंडळाने आक्रमक पवित्रा घेत फडणवीस यांच्या निवासासमोर ठिय्या मांडला.
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावी या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र परवानगी नसल्याने फडणवीस यांनी शिष्टमंडळाची भेट नाकारली. त्यामुळे शिष्टमंडळाने आक्रमक पवित्रा घेत फडणवीस यांच्या घरासमोर ठिय्या दिला. त्यानंतर फडणवीस यांच्याशी भेट झाली. यावेळी फडणवीस यांनी शिष्टमंडळाला केंद्र सरकारकडे जोरदार पाठपुरावा करून तत्काळ कांद्यावरील निर्यातबंदी हटवली जाईल असे आश्वासन दिले. शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अवर सचिव अजय चौधरी यांना प्रत्यक्ष भेटून लेखी पत्र देऊन निर्यातबंदी उठविण्याची मागणी केली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, धुळे जिल्हाध्यक्ष संजय भदाणे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अभिमान पगार, मालेगाव तालुकाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कळवण तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, कोपरगाव तालुकाध्यक्ष वसंत देशमुख, येवला तालुकाध्यक्ष विजय भोरकडे, शेखर कापडणीस, भगवान जाधव, सुनील ठोक, किरण सोनवणे, समाधान गुंजाळ, दिगंबर धोंडगे, नयन बच्छाव, हर्षल अहिरे, भाऊसाहेब शिंदे, कैलास जाधव, सुरेश ठोक, आबा आहेर, ज्ञानेश्वर ठोक, गंगाधर मोरे आदी कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.