कांदा काढणीसाठी मिळेना मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 04:19 PM2019-02-16T16:19:18+5:302019-02-16T16:19:35+5:30
दुप्पट मजुरीची मागणी : शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
देशमाने : कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाने शेतकरीवर्ग नैराश्यग्रस्त असताना आता लाल कांदा काढण्यासाठी मजुर मिळत नसल्याने या नवीनच समस्येने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. परिसरातील अनेक गावांत सध्या लाल कांदा काढणीची लगबग सुरू आहे. मात्र सततच्या बदलत्या हवामानामुळे कांदा काढणीस कुदळाचा वापर सर्रासपणे करावा लागत आहे. परिणामी मजूर वर्गाचा वेळ व मेहनत अधिक खर्ची पडत आहे. परिणामी, मजुरवर्ग कांदा काढण्यास नकार देत आहे. तयार झालाच तर अधिक पैशाची मागणी करत आहेत.हवामान सतत बदलते असल्याने एरव्ही काढणीस आलेल्या कांद्याने यंदा मात्र चोहोबाजूंनी जेरीस आणले आहे. पोषक व निर्भेळ वातावरण यामुळे कांद्याचे पीक भरघोस वाढले. वाढलेली व खोलवर कांद्याची मुळे गेली तर गत चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने कांदापात सुकून गेली आहे. या कारणास्तव कांदा काढण्यास त्रासदायक ठरत आहे. सदर कामास अधिक वेळ, श्रम लागत असल्याने मजूर वर्ग अधिक पैशांची मागणी करत आहे.
आधीच कांद्याच्या अल्प बाजार भावामुळे चिंताग्रस्त असलेला शेतकरी वर्ग मजुर तुटवड्यामुळे बेजार झाला आहे. अधिकांश शेतकरी तर कुटूंबातील सहान-थोरासह कांद्याची काढणी करताना दिसत आहे.
२५ टक्के रक्कम कांदा काढणीसच खर्च
प्रतिएकर ७५०० रुपये कांदा काढणीचा प्रचलित भाव असताना, परवडत नाही म्हणून मजुरांनी नकार दिला. कांदा सरासरी ४०० रुपये क्विंटल या दराने विक्री होत आहे. यातील २५ टक्के रक्कम कांदा काढणीसच खर्च होत आहे. अन्य उत्पादन खर्च कांदाविक्रतून निघत नसताना कांद्याचे पीक सोडून देण्याची वेळ आली आहे.
- निखिल दुघड, शेतकरी, देशमाने.