कांद्यावरील प्रबंधास राष्ट्रीय पारितोषिक
By admin | Published: April 7, 2017 12:54 AM2017-04-07T00:54:02+5:302017-04-07T00:54:12+5:30
चांदवड : येथील स्व. कांताबाई भवरलाल जैन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘स्मार्ट ओनियन वेअर हाऊस’ या कांद्यावरील प्रबंधाला गुंटूर येथे प्रथम क्रमांकाचे परितोषिक मिळाले.
चांदवड : येथील एस. एन. जे. बी. संचलित स्व. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘स्मार्ट ओनियन वेअर हाऊस’ या कांद्यावरील प्रबंधाला गुंटूर (आंध्र प्रदेश) येथे राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपयांचे परितोषिक मिळाले.
सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या कांद्याचे नुकसान झाल्यास स्मार्ट पद्धतीने कसे व्यवस्थापन करता येईल याचे नियोजन विद्यार्थ्यांनी प्रबंधातून सादर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ए.आर.सी.टी. उच्च शिक्षण मंडळ, भारत सरकार मानव संशोधन विकास यांच्या वतीने स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१७ या स्पर्धेचे आयोजन भारतभर करण्यात आले होते. तसेच एम.एच.आर.डी., परसिस्टंट सॉफ्टवेअर ली, नॅसकॉम, एन.आय.सी. व रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान या कंपन्यांच्या सहयोगातून भारत सरकारने ही स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेत ६७२ प्रॉब्लेम स्टेटमेंट मागविण्यात आले होते. त्यात चांदवड महाविद्यालयातून १० प्रबंध पाठविण्यात आले होते. पैकी सहा प्रबंधांची देशपातळीवर निवड करण्यात आली. यात स्मार्ट ओनियन वेअर हाऊसला प्रथम परितोषिक मिळाले व विजेत्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत नोकरीची हमी मिळाली आहे. सदर स्पर्धा सतत ३६ तास चालली होती.
या प्रबंधात संदीप गांगुर्डे या शेतकऱ्याच्या मुलाने कांदा चाळीचे होणारे नुकसान कसे टाळता येईल व शेतकऱ्यांना साठविलेल्या कांद्याचे मॉनिटरिंग घरबसल्या मोबाइलद्वारे कसे करता येईल हे प्रात्यक्षिकांसह दाखवून दिले.
त्याच्या समवेत दिव्या गुगलिया, दिव्या चोरडिया, पायल पारख, श्रद्धा जैन, चेतन पाटील या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. अतिशय चुरशीच्या या स्पर्धेत रात्री १०.३० वाजता विजेत्या संघाचे नाव घोषित करण्यात आले.
या स्पर्धेचे प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्रतिनिधी प्रा. संतोष अंभोरे, प्रबंधाचे मार्गदर्शक प्रा. भावना खिंवसरा, संगणक विभागप्रमुख प्रा. कैंजन संघवी, ईआरपी समन्वयक डॉ. महेश संघवी, प्रा. विपुल अग्रवाल आदिंनी सहकार्य केले. विजेत्या संघाचे संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष अजित सुराणा, झुंबरलाल भंडारी, दिनेशकुमार लोढा यांनी कौतुक केले आहे. (वार्ताहर)