जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ‘कांदा फोडो’
By admin | Published: August 30, 2016 01:02 AM2016-08-30T01:02:58+5:302016-08-30T01:04:29+5:30
स्वाभिमानी संघटना : कांद्याला दोन हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्या
नाशिक : कांद्याला प्रतिकिलो पाच रुपये अनुदान द्यावे व दोन हजार रुपये हमीभाव जाहीर करावा आदि मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मारत ‘कांदा फोडो’ आंदोलन केले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या आंदोलनात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येत निवेदन स्वीकारल्यानंतर ते मागे घेण्यात आले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पन्नासहून अधिक आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे दालन गाठले, परंतु जिल्हाधिकारी रजेवर तर प्रभारी जिल्हाधिकारी मुंबईला गेल्याने आंदोलनकर्त्यांनी दालनाबाहेरील मोकळ्या जागेतच ठिय्या मांडत सोबत आणलेले कांदे जमिनीवर टाकून शासनाचा निषेध व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यातच ठिय्या मारल्याने तत्काळ पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिस येईपर्यंत आंदोलनकर्ते तेथेच बसून होते, उलट त्यांनी सोबतचे कांदे फोडून आणलेल्या भाकरीबरोबर खाण्यास सुरुवात केली. (प्रतिनिधी)