भाव कोसळल्याने रस्त्यावर ओतला कांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 04:21 PM2018-12-12T16:21:29+5:302018-12-12T16:21:37+5:30
सटाण्यात आंदोलन : दीड रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त
नाशिक - जिल्ह्यातील आघाडीचा कांदा उत्पादक तालुका म्हणून परिचित असलेल्या बागलाणमध्ये बुधवारी (दि. १२) नवीन कांद्याला अवघा दीड रु पये किलो भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तोच कांदा रस्त्यावर आणून ओतत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी शेतक-यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, राष्वादी कॉँग्रेसनेही या आंदोलनात उडी घेत शेतक-यांना पाठिंबा दर्शविला.
तालुक्यात दुष्काळी पार्श्वभूमीवरही नवीन कांद्याची आवक सुरू झाली असून दुसरीकडे समाधानकारक भाव नसल्याने चाळीत साठवलेल्या उन्हाळी कांद्याचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे, बाजारात नवीन व जुना अशा दोन्ही प्रकारचा कांदा येत असून दरातील घसरगुंडी मात्र कायम आहे. सद्यस्थितीत कांद्याला अतिशय नीचांकी अल्प दर मिळत असून त्यात उत्पादन खर्चच नव्हे तर वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग प्रचंड संतप्त झाला आहे. बुधवारी सकाळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरू होताच बाजारभावात सुधारणा न होता उलटपक्षी जास्तच घसरगुंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी ट्रॅक्टर बाजार समिती बाहेर आणून राष्ट्रीय महामार्गावर सर्व कांदा रस्त्यावर ओतून दिला. रस्त्यावर सर्वत्र कांदा पसरल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आंदोलनात उडी घेत रस्त्यावर चक्काजाम आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग व मालेगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दीड तासानंतर शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले.