निर्यातबंदी उठविल्यानंतर कांदा दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 11:19 PM2020-12-29T23:19:39+5:302020-12-30T00:11:29+5:30
नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी येत्या १ जानेवारी, २०२१ पासून हटविण्याचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या निर्णयानंतर लासलगाव बाजार समितीत लाल कांदा दरात सहाशे रुपयांनी, तर उन्हाळ कांदा दरात सुमारे तीनशे रुपयांनी वाढ झाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यापुढील काळात कांद्याला चांगला दर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारने सप्टेंबर, २०२० मध्ये कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातबंदी घोषित केली होती. त्यानंतर, या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटत शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनाची भूमिका घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात होत असलेली घसरण लक्षात घेता, शेतकऱ्यांनी कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी जोर लावला होता. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने येत्या १ जानेवारी, २०२१ पासून कांदा निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे तत्काळ परिणाम दिसून येणार नसले, तरी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मंगळवारी (दि. २९) लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावाप्रसंगी दरात तेजी बघायला मिळाली. लाल कांदा दरात सहाशे रुपयांची वाढ झाली. लासलगांव बाजार समितीच्या पहिल्या सत्रात उन्हाळ कांदा दर किमान ८०१ ते कमाल १,९८१ व सरासरी १,५०० रुपये तर लाल कांदा किमान १,००० ते कमाल २,६६८ रुपये व सरासरी २,४०० रुपये बाजारभाव राहिले. सोमवारी (दि.२८) याच समितीत साठ वाहनांतील ६६४ क्विंटल उन्हाळ कांद्याचा दर ५०० ते १,६८० व सरासरी १,४०० रुपये होता, तर १,१४७ वाहनांतील १४ हजार ७१० क्विंटल लाल कांद्याचा दर १,२०० ते २,०७२ व सरासरी १,९५१ रुपये होता.
पिंपळगावी दर जैसे थे
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी उन्हाळ कांद्याला जास्तीतजास्त २,६०० तर लाल कांद्याला २,८८१ रुपये दर मिळाला. कांदा निर्यात उठविण्याच्या घोषणेचा अद्याप काहीही परिणाम दरावर जाणवला नाही. पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची ३० ट्रॅक्टर व २० वाहनातून तर लाल कांद्याची ६९८ वाहनातून आवक झाली. उन्हाळ कांद्यास जास्तीतजास्त २,६००, कमीतकमी १,४०० सरासरी २,३२५ दर मिळाला, तर लाल कांद्यास जास्तीतजास्त २,८८१, कमीतकमी १,५०० सरासरी २,२५१ बाजारभाव मिळाला. गेल्या कित्येक दिवसांपासून कांदा दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. निर्यात खुली करण्याचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादकांना दरवाढीकडे लक्ष लागून आहे.