कांद्याच्या दरात घसरण
By admin | Published: December 12, 2015 11:46 PM2015-12-12T23:46:23+5:302015-12-12T23:47:54+5:30
तरीही किरकोळ भाव जास्तच
पूर्वा सावजी /
गायत्री जेऊघाले ल्ल नाशिक
डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झाल्याने एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करीत असताना दुसरीकडे अद्यापही किरकोळ विक्रीच्या दरात काहीही बदल झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग सरासरी दहा रुपये दराने कांदा विकत असताना ग्राहकांना मात्र तो सुमारे २५ रुपये किलो दरानेच खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील १५ दिवसांत कांद्याच्या भावात क्विंटलमागे १५०० रुपयांची घसरण झालेली दिसून येते. म्हणजेच कांद्याचे आताचे भाव ९०० ते १२०० रुपये क्विंटल आहे.
व्यापारीवर्ग शेतकऱ्यांकडून कांदा घेताना ९ ते १२ रुपये किलोने घेतो. हाच कांदाविक्रेते आणखी भाव वाढवून ग्राहकांना तो कांदा २० ते २५ रुपये किलोने मिळतो. यामध्ये शेतकरी आणि ग्राहक यांचेच नुकसान होते.
नाशिक शहरात वेगवेगळ्या भागात कांद्याचे वेगवेगळे भाव आढळून येतात. भद्रकाली परिसरात १८ रुपये किलोने कांदा मिळतो आणि तोच
कांदा कॉलेजरोड, गंगापूररोड भागात २५ रुपये किलोने ग्राहकांपर्यंत पोहोचतो.
सहा ते आठ महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव गगनाला भिडलेले होते. आज जो कांदा ९०० ते १२०० रुपये क्विंटलप्रमाणे मिळतो, तोच कांदा आधी सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे बाजारात उपलब्ध होता, परंतु आता नवीन कांद्याचे उत्पन्न निघाल्याने कांद्याच्या दरात घसरण झालेली दिसते.