नाशिक जिल्ह्यात कांदा दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 01:51 AM2022-03-24T01:51:56+5:302022-03-24T01:52:11+5:30
देशांतर्गत मागणीत घट होऊन तसेच विविध राज्यांत स्थानिक कांदा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये होळीनंतर लाल व नवीन उन्हाळी कांद्यांच्या दरात दीडशे ते दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. उमराणे बाजार समितीत लाल कांद्याचे सर्वोच्च दर ९५० रुपये तर उन्हाळी कांद्याचे दर १०५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
नाशिक : देशांतर्गत मागणीत घट होऊन तसेच विविध राज्यांत स्थानिक कांदा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये होळीनंतर लाल व नवीन उन्हाळी कांद्यांच्या दरात दीडशे ते दोनशे रुपयांची घसरण झाली आहे. उमराणे बाजार समितीत लाल कांद्याचे सर्वोच्च दर ९५० रुपये तर उन्हाळी कांद्याचे दर १०५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
होळीच्या सणाअगोदर लाल व उन्हाळी कांद्यांचे दर एक हजार ते तेराशे रुपयांपर्यंत होते. परंतू सद्यस्थितीत राजस्थान,अलवर, बंगाल आदी राज्यांमध्ये स्थानिक कांदा बाजारात उपलब्ध झाल्याने तसेच देशांतर्गत मागणीतही घट झाल्याने बाजारभावात घसरण झाली आहे. शिवाय बहुतांशी व्यापारी बांधवांकडे कांदा गोणी भरण्यासाठी कोकणी मजूर वर्ग आहे. परंतू त्यांचा मुख्य सण होळी असल्याने ते गावी गेल्याने मजूर टंचाईमुळेही बाजारभावावर काहीअंशी परिणाम झाल्याचे कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान,होळीआधी लाल कांद्याचे दर ११०० रुपये तर नवीन उन्हाळी कांद्याचे दर १२०० रुपयांपर्यंत होते. मात्र होळीनंतर तब्बल दीडशे ते दोनशे रुपयांची घसरण झाली असून लाल कांद्यास कमीत कमी ४०१ रुपये,जास्तीत जास्त ९५० रुपये तर उन्हाळी कांद्यास कमीत कमी ५०१ रुपये, जास्तीत जास्त १०५० रुपये बाजारभाव मिळाला आहे. बाजारभाव कमी झाल्याने कांदा पिकापासून मिळणारा नफा तर दूरच परंतू उत्पादनासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तालुक्यातील नांदूरशिंगोटे व दोडी बुद्रुक उपबाजारातही गेल्या वीस दिवसांत तब्बल १ लाख ८० हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. मात्र गत महिन्याच्या तुलनेत तब्बल कांदा दरात सरासरी एक हजार ते बाराशे रुपये प्रतिक्विंटल घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. या पंधरवड्यात कांद्यास सरासरी प्रति क्विंटल एक हजार रुपये भाव मिळाला आहे. आगामी काळात उन्हाळी कांद्याची आवक होणार असल्याने त्याचा थेट परिणाम लाल कांद्याच्या बाजारभावावर झाल्याचे चित्र आहे.