उमराणे बाजार समितीत कांदा दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 06:10 PM2019-11-25T18:10:08+5:302019-11-25T18:10:22+5:30
लाल कांद्याची आवक वाढली : ८ हजार १०० रुपये भाव
उमराणे : मागणी व पुरवठा याचे प्रमाण व्यस्त झाल्याने उन्हाळ कांद्याचे दर दहा हजार रु पये गाठतील अशी अपेक्षा असतानाच बाजारात लाल कांद्याची आवक वाढल्याने येथील बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत उन्हाळी कांद्याच्या दरात तिनशे तर लाल कांद्यांच्या दरात पाचशे रु पयांची घसरण झाली आहे.
मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने उन्हाळी कांद्याची लागवड कमी प्रमाणात झाली होती. त्यातच चालू वर्षी सुरुवातीला पाऊस कमी झाल्याने लाल कांद्याच्या लागवडीवर विपरीत परिणाम होऊन दसरा दिवाळीला येणारा लाल कांदा बाजारात आलाच नाही. तर दुसरीकडे रांगडा कांद्याची लागवड बऱ्यापैकी झाली असतानाच मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस व त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसाने ह्या कांद्याचेही नुकसान होऊन बाजारात अत्यंत कमी प्रमाणात आवक होत होती. परिणामी मागील आठवड्यात उन्हाळी कांद्याचे दर नऊ हजारापर्यंत पोहोचले होते. हे दर चालू आठवड्यात दहा हजाराचा पल्ला गाठतील अशी अपेक्षा असतानाच सोमवारी (दि.२५) बाजारात लाल कांद्याची आवक वाढल्याने येथील बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या दरात तिनशे रु पये तर लाल कांद्यांच्या दरात पाचशे रु पयांची घसरण झाली आहे. उन्हाळी कांद्याचे दर कमीतकमी ३ हजार रु पये, जास्तीत जास्त ८ हजार १०० रु पये तर सरासरी ७ हजार रु पयांपर्यंत होते. तसेच लाल कांद्यांचे दर कमीतकमी १ हजार १०० रु पये, जास्तीत जास्त ६ हजार ५०० रु पये, तर सरासरी ४ हजार ५०० रु पयांपर्यंत होते.