कांद्याचे भाव घसरले
By admin | Published: May 12, 2017 01:25 AM2017-05-12T01:25:32+5:302017-05-12T01:26:11+5:30
येवला : येवला व अंदरसूल उपबाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याच्या आवकेत निरंतर वाढच होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : येवला व अंदरसूल उपबाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याच्या आवकेत निरंतर वाढच होत आहे. यंदा भाव निम्म्याने घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गुरुवारी येवला व अंदरसूल कांदा बाजार आवारात किमान १०० ते कमाल ४६० रु पये प्रतिक्विंटल असले तरी सरासरी ३२५ रु पये कांदा विकला गेला. शेतकऱ्यांना ‘बुरे दिन’ आल्याची प्रतिक्रिया बळीराजाने बाजार समितीच्या आवारात गुरु वारी व्यक्त केली. कर्जमाफी तर नाहीच शिवाय शासन आणि जिल्हा बँकेने चालवलेली सक्तीची कर्जवसुली, कांद्याचे निरंतर घसरत असलेले भाव या दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे.
येवला व अंदरसूल उपबाजार समितीत दररोज ७० ते ८० हजार क्विंटल आवक होत आहे. कांदा भावात घसरण होत असल्याचे
चित्र आहे. शासन कांद्याबाबत कधी गंभीर होणार, हाच प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. सत्ता मिळाल्यावर उत्तर प्रदेशात कर्जमाफी झाली. महाराष्ट्रात सत्ता आहे
पण कर्जमुक्ती नाही. या दुटप्पी धोरणाचा निषेध करून आधी कांद्याला भाव द्या आणि संपूर्ण कर्जमुक्ती करा, अशी मागणी
येवला तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.
जानेवारी २०१६ मध्ये २ लाख ९० हजार ९५० क्विंटल आवक होऊन १०५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. यंदा दि. २० जानेवारी २०१७ पर्यंत ४ लाख ७१ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून, केवळ ५२५ रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. तरीही शेतकरी सहन करीत होता. परंतु कांदा भावात निरंतर होणारी घसरण थांबलीच नाही. मे महिन्याच्या प्रारंभी कांदा तब्बल २५० रु पये प्रतिक्विंटलची घसरण पाहून सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.