कांद्याची दरात उसळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:53 PM2020-09-14T22:53:54+5:302020-09-15T01:27:36+5:30
सटाणा : उन्हाळ कांदा चांगलाच तेजीत आला असून, सोमवारी (दि. १४)येथील बाजार समितीत प्रतिक्विंटल भावात कांद्याने चार हजारांचा टप्पा पार केला आहे. सर्वाधिक ४१५० रुपये कांद्याला भाव मिळाला. अतिवृष्टीमुळे यंदा अन्य राज्यातील कांदा पीक वाया गेल्याने कांद्याला भावात तेजी आली आहे.
सटाणा : उन्हाळ कांदा चांगलाच तेजीत आला असून, सोमवारी (दि. १४)येथील बाजार समितीत प्रतिक्विंटल भावात कांद्याने चार हजारांचा टप्पा पार केला आहे. सर्वाधिक ४१५० रुपये कांद्याला भाव मिळाला. अतिवृष्टीमुळे यंदा अन्य राज्यातील कांदा पीक वाया गेल्याने कांद्याला भावात तेजी आली आहे. आज येथील बाजार समितीत सुमारे एकवीस हजार क्विंटल इतकी उन्हाळ कांद्याची आवक होती. सकाळच्या सत्रात सर्वाधिक प्रतिक्विंटल चार हजार १७५ इतका कांद्याला भाव मिळाला तर सरासरी ३६०० ते ३७०० कांद्याला भाव मिळाला. दरम्यान, कांद्याच्या आवकेतही तेजी आली असून, दररोज सरासरी १९ ते २० हजार इतकी कांद्याची आवक असते. नामपूर बाजार समिती आवारातदेखील कांद्याच्या आवकेत सटाण्याइतकीच तेजी होती. मात्र भावात प्रतिक्विंटल आठशे रुपयांची तफावत होती. नामपूरमध्ये सर्वाधिक प्रतिक्विंटल ३३७० रुपये कांद्याला भाव मिळाला तर सरासरी २९०० ते ३००० भाव मिळाला. सटाण्यात कांद्याला भाव मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी नामपूर बाजार आवार सोडून सटाणा बाजार आवारात कांदा विक्रीला आणला होता.
तीन दिवसात १०७५ रुपयांची वाढ ...
सटाणा बाजार आवारात गेल्या शुक्रवारी ३०७५ रुपये सर्वाधिक कांद्याला भाव मिळाला होता. दरम्यान शनिवार आणि रविवारी सुटीचे दिवसवगळता आज सोमवारी तिसºया दिवश्ी कांद्याने भावात अचानक उसळी घेतली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. ढगाळ हवामानामुळे साठवलेल्या कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याच्या विक्री प्रमाणात वाढ होऊन परिणामी बाजारात आवक वाढली आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याने भावात चार हजारांचा टप्पा पार केला असला तरी खाददेखील भाव खाताना दिसत असून, आज कांद्याची खाद १५०० रुपयांपर्यंत विकली गेली.