कांदा उत्पादनात यंदा होणार घट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 09:20 AM2019-10-29T09:20:23+5:302019-10-29T09:28:34+5:30

परतीच्या पावसामूळे लागवड झालेल्या लाल पोळ कांद्यासह टाकलेल्या उन्हाळ कांद्याच्या रोपांना देखील फटका बसला आहे. 

onion production Decrease in this year in niphad | कांदा उत्पादनात यंदा होणार घट

कांदा उत्पादनात यंदा होणार घट

googlenewsNext
ठळक मुद्देपरतीच्या पावसामूळे लागवड झालेल्या लाल पोळ कांद्यासह टाकलेल्या उन्हाळ कांद्याच्या रोपांना देखील फटका बसला आहे. कांदा तुटवड्यातुन बाजारपेठेतील कांद्याचे दर देखील वाढण्याची दाट शक्यता आहे.ढगाळ हवामानाचा देखील उन्हाळ कांदा रोपांवर दुष्परिणाम दिसून येऊ लागला आहे.

लासलगाव /नाशिक - यंदाच्या पावसाळ्यात मध्यंतरी झालेल्या दमदार पावसातून निफाड, चांदवड व येवला तालुका तसेच जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लेट खरीप अर्थातच लाल पोळ कांद्याचे पीक घेतले आहे. जिल्ह्यातील मुख्य पीक समजल्या जाणाऱ्या कांदा पिकाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. याशिवाय खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, तूर, मुग, उडीद आदी पिके निघाल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात यंदाही पुढील रब्बी हंगामासाठी अगदी मोठा खर्च करून उन्हाळ कांद्याची मोलामहागाची रोपे टाकले आहेत. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या परतीच्या पावसामूळे लागवड झालेल्या लाल पोळ कांद्यासह टाकलेल्या उन्हाळ कांद्याच्या रोपांना देखील फटका बसला आहे. 

अवकाळी पावसामुळे शेतजमिनीतच सडू लागलेला लाल पोळ कांदा असो, की दुसरीकडे पुढील रब्बी हंगामातील लागवडीसाठी शेतकऱ्यांनी टाकलेली उन्हाळा कांद्याची रोपे अवकाळी पावसामुळे खराब झालेली आहे. त्यातून शेतकऱ्याने सध्या घेतलेल्या लाल पोळ कांद्याचे होणारे एकरी नुकसान, तसेच उन्हाळा कांद्यासाठीची रोपे कमी होऊन पुढील रब्बी हंगामात अपेक्षित असलेले उन्हाळा कांदा लागवडीखालील क्षेत्रात होणारी घट यामुळे कांद्याबाबतचे सर्वच गणित पुढील काळात बिघडण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे यंदा कांदा उत्पादनात कमालीचा फटका बसताना सरासरी एकरी उत्पादनात शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य मोठे नुकसान बघता शेतकऱ्यांच्या अर्थचक्र कोलमडून पडणार आहेच. तर दुसरीकडे कांदा उत्पादनाचे मोठे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादन घटल्यामुळे पुढील काळात संभाव्य कांदा तुटवड्यातुन बाजारपेठेतील कांद्याचे दर देखील वाढण्याची दाट शक्यता आहे.

कांदा पिकाचेही प्रचंड नुकसान

लागवड केलेला लेट खरीप लाल पोळ कांदा अन् पुढील रब्बी हंगामासाठी टाकलेली उन्हाळा कांद्याची रोपे महासंकटात सापडली गेली आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजवरच्या परंपरेप्रमाणे खरीप हंगामातील उशिराने लागवड केलेला लेट खरीप लाल पोळ कांदा हा उशिरापर्यंत चाललेल्या परतीच्या पावसामुळे शेतजमिनीत पाणी साचून राहताना सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी खरीपनंतरच्या 'रब्बी' हंगामासाठी गेल्या महिनाभरात टाकलेली महत्त्वाच्या 'उन्हाळ' कांद्याची रोपे देखील शेतातील वाफ्यामध्ये पाणी साचू लागल्याने सडू लागली आहेत. याबरोबरच सध्याच्या ढगाळ हवामानाचा देखील उन्हाळ कांदा रोपांवर दुष्परिणाम दिसून येऊ लागला आहे.

 

Web Title: onion production Decrease in this year in niphad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.