जिल्ह्यात कांद्याचा आलेख चढाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:59 AM2017-08-01T00:59:05+5:302017-08-01T00:59:23+5:30
परराज्यात व परदेशात मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात सुधारणा झाल्यामुळे बळीराजा सुखावला असून, सध्या दर्जेदार व प्रतवारीनुरूप कांद्याला १४०० रुपये किंबहुना त्याहीपेक्षा जास्त दर मिळण्याची शक्यता आहे.
वणी : परराज्यात व परदेशात मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात सुधारणा झाल्यामुळे बळीराजा सुखावला असून, सध्या दर्जेदार व प्रतवारीनुरूप कांद्याला १४०० रुपये किंबहुना त्याहीपेक्षा जास्त दर मिळण्याची शक्यता आहे. नाशिक, नगर व पुणे भागातील कांद्याला मलेशिया, सिंगापूर, दुबई व आखाती देशात मागणी वाढली आहे. त्यात नाशिकचा कांदा दर्जेदार व टिकाऊ म्हणून परिचित असल्याने कंटेनरमधून समुद्रामार्गे सात दिवसांचा प्रवास करून सुखरूप व सुरक्षित परदेशी बंदरांवर पोहचत आहे. सद्यस्थितीत नाशिक, नगर व पुणे भागातून सुमारे सात ते आठ हजार कंटेनर कांदा मुंबई पोर्ट बंदरातून परदेशी जात आहे. कांदा खरेदी-विक्रीच्या धोरणाबाबत सरकारने अनुकूलता ठेवण्याचे आव्हान कांदा उत्पादकांनी केले आहे. परराज्यातील कांद्याचा साठा संपल्यात जमा असून, त्यात नवीन कांद्याच्या उत्पादनास अवधी आहे. काही भागात लागवड सुरू आहे तर नवीन कांदा उत्पादित होण्यास ७० ते ९० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. परराज्यात व महाराष्ट्रात थोड्याफार फरकाने अशीच स्थिती आहे. दरम्यान, अनुभवी व प्राप्त परिस्थितीचे अवलोकन करून साठवणूक केलेला कांदा सुरक्षित ठेवणाºया उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत. नाशिक, नगर व पुणे भागातून प्रतिदिवशी सुमारे आठ हजार कंटेनर परदेशात जात असल्याची माहिती कांदा निर्यातदार मनीष बोरा यांनी दिली. मुंबई भागातील न्हावा शेवा जैन पिटी पोर्ट तसेच बॉम्बे पोर्टअंतर्गत येणाºया बंदरावर परदेशात जाणारे कांदे कंटेनरद्वारे जहाजात ठेवण्यात येतात. क्षमतेइतका माल जहाजात ठेवल्यानंतर कांद्याची परदेशवारी सुरू होते. सुमारे सात दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर कांदा पोहचत असल्याची माहिती व्यापारी नंदलाल चोपडा व अशोक बोरा यांनी दिली.
निर्यात शुल्कावर परिणाम शक्य
पाकिस्तान, चीन व भारतातून सध्या कांद्याची निर्यात सुरू आहे. पाकिस्तान व चीनचे कांदा निर्यात शुल्क २५० ते ३०० डॉलर इतके आहे, तर भारताचेही निर्यातशुल्क या प्रमाणात राहिले तर कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील गतिमानता किमान दोन महिने अशीच राहील, अशी माहिती बोरा यांनी दिली. कारण भूतकाळात निर्यातशुल्क वाढल्याने निर्यातबंदीवर याचा परिणाम झाला होता. कांदा खरेदीकडे व्यापाºयांनी पाठ फिरविली होती. पर्यायाने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले होते व उत्पादकांनी अक्षरश: कांदे रस्त्यावर फेकले होते. अशा स्थितीमुळे उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी निर्यातशुल्क व निर्यात याच्या समन्वयासाठी सकारात्मक व अनुकूल भूमिका अपक्षित असून, यावरच कांद्याच्या दराचे गणित अवलंबून असल्याचा सूर व्यापारी व उत्पादकांचा असल्याची माहिती अतुल पाटील यांनी दिली.
वणी उपबाजारात ७५०० क्ंिवटल कांद्याची आवक
वणी : कांद्याचा निर्माण झालेला तुटवडा व वाढलेल्या मागणीमुळे कांद्याच्या दरात होणारी वाढ उत्पादकांना दिलासा देणारी आहे. वणी उपबाजारात आज २५० वाहनांमधून सुमारे ७५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कळवण, देवळा, चांदवड तालुक्यातील उत्पादकांनी विक्रीसाठी कांदे उपबाजारात आणले होते. १४०० रु पये कमाल, किमान ११०० रुपये तर सरासरी १२०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी - विक्रीचे व्यवहार पार पाडण्यात आले. कांद्याला मागणी वाढली असून, प्रतवारी करून कांदा विक्रीसाठी आणावा. त्यामुळे दर अधिक मिळतील, त्यानुसार उत्पादकांनी नियोजन आखण्याचे आवाहन दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील यांनी केले आहे.