पाटणे परिसरात कांदा उत्पादन घटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:13 AM2021-03-14T04:13:54+5:302021-03-14T04:13:54+5:30
सततच्या बदलत्या रोगट वातावरणाचा फटका त्यातच मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने कांदा ...
सततच्या बदलत्या रोगट वातावरणाचा फटका त्यातच मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने कांदा पिकावर करपा रोग मोठ्या प्रमाणात वाढीस लागला. त्यामुळे यावर्षी कांद्याचे अपेक्षित उत्पादन मिळेल की नाही या चिंतेने बळीराजा धास्तावला आहे.
यावर्षी सुरुवातीला अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे खराब झाली. दुबार बियाणे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. दोन ते तीन हजार रुपये दराने बियाणे खरेदी करून रोपे तयार करण्यात आली. कांदा लागवडीसाठी ८ ते १० हजार रुपये एकरी मजुरी, त्यातच मजुरांची टंचाई, रासायनिक खतांचे वाढलेले दर अशा एक ना अनेक समस्यांना तोंड देत बळीराजाने कांदा लागवड केली. मात्र एक महिन्यापूर्वी अवकाळी पाऊस झाल्यानंतर थंडी नाहीशी झाली. निसर्गाचा लहरीपणाचा फटका बसून करपा रोगाने मोठ्या प्रमाणात कांद्याच्या पिकावर हल्ला केला आहे. महागडी औषधे फवारणी करूनही रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताना दिसत नाही.
इन्फो
शेतकरी हतबल
उन्हाचा प्रकोप, विजेचा लपंडाव, भारनियमन अशा सर्व समस्यांमुळे उन्हाळ कांद्याचे अपेक्षित उत्पादन हाती लागणार नसल्याकारणाने शेतकरी हतबल झाला आहे. हजारो रुपये खर्च करूनही उत्पादन मिळेल याची शाश्वती नाही. त्यातच दिवसेंदिवस कोसळणाऱ्या कांद्याचे दराने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.